मढी : उटणे लेपण विधी रंगला 12 तास; ‘बडे बाबा की जय’घोषाने परिसर दुमदुमला

मढी : उटणे लेपण विधी रंगला 12 तास; ‘बडे बाबा की जय’घोषाने परिसर दुमदुमला
Published on
Updated on

मढी; पुढारी वृत्तसेवा : मायंबा येथे राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या सात लाख भाविकांनी मच्छीद्रनाथांच्या संजीवन समाधीवर सुगंधी उटण्याचा लेप लावण्यासाठी गर्दी केली. अतिशय भक्तिमय वातावरणात नाथ भक्तांच्या उपस्थितीत मच्छिंद्रनाथांचा समाधी सोहळा पार पडला. सुगंधी उटणे लेपण विधी सुमारे 12 तास सुरू होता. दर्शनरांगेतून शॉवरद्वारे आंघोळ, आतषबाजी, विद्युत रोषणाईने उजळलेला मायंबा गड येणार्‍या भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. 'बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला.

मायंबा येथे नाथपंथाचे आद्य मत्सेंद्रनाथ यांची संजीवन समाधी आहे. गुढीपाडव्याला नवीन वर्षाच्या प्रारंभी समाधीवर सुंगधी उटणे लावून नूतन वस्र अर्पण करून नाथांचे पूजन करत लाखो भाविकांनी नाथांचा आशिर्वाद घेतला. मायंबा येथे दर्शन रांगेतील प्रत्येक भाविकाला समाधीला थेट स्पर्श करण्याची संधी उपलब्ध होत असल्याने दिवसेंदिवस भाविकांची गर्दी लाखोंच्या संख्येने जमत असून, यंदा मागील गर्दीचा उच्चांक मोडला. तीन किमी बनवण्यात आलेली दर्शन रांग 5 किमीपर्यंत करण्यात आली; मात्र 5 किमीपयर्ंत बांधलेले बॅरिगेटही प्रंचड गर्दीमुळे कमी पडले. वाहनांच्या गर्दीपुढे पार्किंग व्यवस्था व रस्ते कमी पडले. भविकांच्या विक्रमी गर्दीने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

सायंकाळी भक्तांची पावले मच्छिंद्रनाथ गडावर पडू लागल्याने करंजी, मायंबा घाटत तिसगाव- नगर माहामार्गवर अनेक वेळा वाहतूक कोंडी झाली. बीड, आष्टी, पाथर्डी, छत्रपती संभाजीनगर, नगर आदी ठिकाणावरून गडाकडे येणार्‍या रस्त्यांवर खासगी वाहनांची लांबच लांब रांग होती. सायंकाळी दहानंतर भक्तांची संख्या वाढत जाऊन पाहाटे 6 वाजेपर्यंत कायम होती. मायंबा गड परिसरातील भाविकांच्या खासगी वाहनांनी माळरान भरून गेला होता. भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे रात्रभर गडावर दाखल होत होते.

यात्रेसाठी आलेल्या प्रत्येकाला चैतन्य शक्तीची अनुभूती मिळाली. उटी लेपणाचा विधी संपूच नये, असे भाविकांना वाटून थंडीतही भाविक अध्यात्मिक आनंदात तल्लीन झाले. राज्यातील आषाढी यात्रेनंतरची सर्वात मोठी गर्दी होणारी मायंबाची यात्रा असून, मढी वृद्धेश्वर मायंबा अशा 30 किलोमीटरच्या वर्तुळात वाहनांची व भाविकांची सारखीच गर्दी होती. सुमारे पाच लाख रुपयांच्या फटाक्यांच्या आतीशबाजीने संपूर्ण परिसर उजळून निघाले.

भाविकांना दर्शनरांगेतून शॉवरद्वारे आंघोळीची सुविधा यशस्वी झाली. सुगंधी उटणे लेपण विधीसाठी आलेले भाविक हाफचड्डीवर दर्शन रांगेत होते. समाधीस स्पर्श करण्यासाठी ओल्या कपड्यांसह मंदिरात प्रेवश करून संजीवन समाधीला लेप लावल्यानंतर भविकांना मिळणारा आत्मसुखाचा आनंद अवर्णनिय होता. देवस्थान समितीचे मार्गदर्शक आमदार सुरेश धस, देवस्थान समितीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, राजेंद्र म्हस्के, विश्वस्त अनील म्हस्के, उपाध्यक्ष बाबासाहेब म्हस्के, सर्व कर्मचारी, स्वयंसेवकांसह सर्व विश्वस्त आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

दर्शन रांग सहा किलोमीटरपर्यंत
सहा किलोमीटरपर्यंत दर्शन रांग, तर व्हीआयपीची दर्शन रांग दोन किमीपर्यंत होती. मंगळवारी दुपारनंतर मायंबा गड भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होता. या सोहळ्यासाठी ज्यांना दर्शना रांगेत तासन्तास उभे राहता येत नाही, अशा भाविकांनी हा सोहळा पाहात समाधान मानले.

योग्य नियोजनामुळे गर्दी वाढली : आमदार धस
मच्छिंद्रनाथांचा महिमा सर्वदूर गेल्याने मागील काही वर्षे गर्दीचा आलेख वाढतच असून, या सोहळ्याचे शिस्तबद्ध नियोजन केले जाते. यामुळे काही वर्षांपूर्वी हजारात असलेला हा सोहळ्याला सात ते आठ लाख भाविक येत आहेत. तत्काळ दर्शनासाठी देणगी पावत्यांद्वारे मायंबा देवस्थान समितीला मिळत असलेला लाखोच्या निधीचा योग्य विनीयोग करून मंदिराचा जिर्णोधार करून भत्तनिवास, अन्नदान, पिण्याचे पाणी, पार्किंग, शौचालये, स्वच्छतागृहांसह विविध सुविधा भाविकांना उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.

आतिषबाजी पाहून पारणे फिटले
दुबई, कल्याण, छत्रपती संभाजीनगर, नाशिकच्या भाविकांनी मध्यरात्रीनंतर लाखो रुपये खर्चून केलेली भव्य अतिषबाजी पाहून सर्वच भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. आत्तापर्यंतचे सर्व गर्दीचे उच्चांक मोडले. मच्छिंद्रनाथांचा समाधी सोहळा नयनरम्य होता. नाथ भक्तांसाठी हा सोळा एक परवणी ठरत असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकद्वारे सोहळ्याचे जगभर दर्शन घडवले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news