राहुरी : पुढारी वृत्तसेवा : शेतकर्यांना हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी शास्त्रज्ञांसह विद्यार्थ्यांनी अधिक काम करावे. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकर्यांच्या उन्नतीसाठी करावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 36 व्या पदवीदान समारंभात राज्यपाल कोश्यारी बोलत होते.
व्यासपीठावर कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा कृषी मंत्री अब्दुल सत्तार, प्रमुख पाहुणे डॉ. अनिल काकोडकर, नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी व महाराष्ट्र राज्याचे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आ. चिमणराव पाटील, दत्तात्रय उगले, डॉ. प्रदिप इंगोले, गणेश शिंदे, संजीव भोर, अधिष्ठाता (कृषी) डॉ. उत्तम चव्हाण, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, कुल सचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापुसाहेब भाकरे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलिप पवार आणि विद्या शाखेच्या उपकुलसचिव आशा पाडवी उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, भारतात हरितक्रांती कृषी शास्त्रज्ञांमुळे आली. यानंतर आपला देश अन्न-धान्यांमध्ये स्वयंपूर्ण झाला. जगात ज्यावेळी दुष्काळ पडतो, तेव्हा इतर देश भारताकडे अन्न-धान्यासाठी बघतात. यामुळे कृषी क्षेत्र महत्वाचे गणले जाते. या क्षेत्रात पदवी घेतली, याचा आपण अभिमान बाळगावा, असे सांगत रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीचे आरोग्य खालावले आहे. ते सुधारण्यासाठी शेतकर्यांनी सेंद्रिय खतांचा जास्तीत- जास्त वापर करावा. भरडधान्य गरीबांचे धान्य म्हणुन गणले जायचे, पण त्यामधील पौष्टीकता लक्षात घेता या धान्यांना जगात मान्यता मिळाली आहे. त्यांचा आहारामध्ये जास्तीत- जास्त वापर करणे गरजेचे आहे.
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, ग्रामीण भारताचा विकास कृषी शिक्षण घेतलेले विद्यार्थीच करु शकतात. तंत्रज्ञानाची अंमलबजावणी, त्याचा प्रसार, नवे तंत्रज्ञान मिळण्यासाठी आवश्यक वातावरण तयार केल्यास ग्रामीण भागाचे सशक्तीकरण होवू शकते. कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील विद्यापीठ अहवाल सादर करताना म्हणाले, विद्यापीठ विविध विषयांमध्ये पदविका, कृषी पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदव्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देते. विद्यापीठाने कास्ट प्रकल्पाच्या माध्यमातुन ड्रोन तंत्रज्ञानाबरोबरच देशी गायींवरील संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. गेल्यावर्षी विद्यापीठाने विविध पिकांचे 6 वाण, 4 कृषी यंत्रे व औजारे तर 70 तंत्रज्ञान शिफारशी विकसित करुन शेतकर्यांसाठी प्रसारीत केल्याचे कुलगुरु डॉ. पाटील म्हणाले.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार व कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी व महाराष्ट्र राज्याचे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' या मानद पदवीने सन्मानित केले. पदवीदान समारंभात सन 2021-22 मध्ये बी.एस्स.सी (कृषी) पदवीत प्रथम आलेली अपुर्वा वामन, बी.एस्स.सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम सिध्दम्मा हलोली, कृषी अभियांत्रिकीमध्ये प्रथम शालिनी आभाळे यांना सुवर्णपदक तर इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.
या समारंभासाठी माजी कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे, डॉ. अशोक ढवण, माजी आ. चंद्रशेखर कदम, माजी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, पुणे येथील कृषी परिषद विस्तार संचालक डॉ. विठ्ठलराव शिर्के, कृषीभूषण सुरसिंग पवार व विष्णू जरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी केले.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, तुमच्यावर भविष्यात शेतकर्यांना सक्षम करण्याची मोठी जबाबदारी आहे. शेतकर्यांसह शेतमजुर व गोरगरींबासाठी काम करा.
62 विद्यार्थ्यांना पीएच. डी., 382 पदव्युत्तर पदवी व 6,388 विद्यार्थ्यांना पदवी अशा 6,832 पदव्या प्रदान करण्यात आल्या.