

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यात आभाळ फाटले असून, वादळीवार्यासह गारपीट पावसाने शेतकर्यांच्या पिकांचे पूर्ण नुकसान झाले. तर, अनेक घरांच्या छतावरील पत्रे उडाल्याने काहींचे संसार उघड्यावर आले. बक्तरपूरच्या नदीत दुथडी वाहिली. पावसात दोन हजार कोंबड्या, दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. आंबा, दाक्षे, डाळींब, झाडाला लागलेली फळे गळाली. वादळाचा रुद्रावतार पाहून नागरिकांचा भीतीने थरकाप उडाला होता. आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी सदस्य हर्षदा काकडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकर्यांना मदत मिळून देण्याचा दिलासा दिला.
शुक्रवारी दुपारी अचानक तालुक्याच्या शहरटाकळी, देवटाकळी, ढोरसडे, अंत्रे, मजलेशहर, बक्तरपूर, भातकुडगाव, भायगाव, खामगाव, जोहरापूर, हिंगनगाव, ढोरजळगाव, दादेगाव परिसरासह इतर काही भागाला निसर्गाने धोका दिला. तुफानी वादळात गारांचा जोरदार पाऊस झाल्याने शेकडो हेक्टरमधील कांदा, गहू, उन्हाळी बाजरी, चारा पिके भूईसपाट झाली. तर, आंबा, द्राक्षे, डांळीब फळबागांचे अतोनात नकुसान झाले. वादळाचा वेग पाहता या भागातील नागरिकांचा भीतीने थरकाप उडाला होता. या वादळात काही घरांच्या छतावरील पत्रे उडून गेली.
बक्तरपूरच्या नदीत दुथडी पाणी वाहू लागले, काही क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली. गारपीटीने उभे पीक भूईसपाट झाले. घरात येणारे पिक हिरावून गेल्याचे पाहताच शेतकरी हाय मोकलत होते. अनेकांच्या भावना अनावर झाल्या होत्या. भानुदास क्षीरसागर यांच्या घराच्या छतावरील सर्व पत्रे उडून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला. घरातील संसार व मळणी केलेला गहू भिजला. सुनील दीक्षितांच्या घराचे छत उडून गेले, तर बक्तरपूर येथे ज्ञानदेव सामृत, दत्तात्रय सामृत, भाऊसाहेब मिरझे यांच्यासह इतरही घरावरील पत्रे उडाले.
दोन शेळ्या दगावल्या शहरटाकळी शिवारात विशाल गवारे यांच्या कुक्कुट पालन शेडमधील दोन हजारा कोंबड्या व पिलांचा पावसाणे मृत्यू झाला. दीड एकर द्राक्ष बागाचे नुकसान झाले. तसेच, मजलेशहर येथील संजय पवार यांच्या दोन शेळ्या दगावल्या आहेत.
पत्र्याचे घर उडाल्याने संसार उघड्यावर
देवटाकळी शिवारात दत्तात्रय शंकर सांवत यांचे पत्र्याचे घरच उडून गेले. रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान वादळासह गारपीट सुरू झाल्याने कुटुंब घरात झोपले असता अचानक वादळात संपूर्ण घरच उडून बाजुला पडल्याने उघड्यावर पडलेला त्यांचा संसार व पंचवीस पोते गहू रात्रभर पावसाने ओला चिंब झाला. घर उडताच त्यांनी लगतच्या शौचालयाचा आधार घेतला. नंतर शेजारच्या घरी आश्रय घेतला. कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दुसर्या दिवशीही वीजपुरवठा बंद
वादळाने परिसरात जवळपास 70 ते 80 विद्युत पोल पडल्याने शनिवारी दुसर्या दिवशीही वीज पुरवठा बंद होता. शेतात साचलेले पाणी पाहता त्यांना पोल उभे करणे अशक्य असल्याने किती काळ येथील नागरिक अंधारात राहणार हे सांगता येत नाही. मात्र, महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी पाहणी करत होते. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन-तीन दिवस लागतील, असे उपविभागीय अभियंता एस. आर. लोहारेंनी सांगीतले.