

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : हॉटेल व्यावसायिक असलेल्या मामा भाच्याला नगर – औरंगाबाद महामार्गावर खडका फाट्याजवळ चोरट्यांनी लुटले. त्यांच्याकडील सुमारे साडेचार तोळ्याचे दागिने लंपास करण्यात आले. मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला. वेळेवर पोलिस आल्याने चोरटे मोटारसायकल सोडून पसार झाले. नेवासा पोलिस ठाण्यात तीन चोरट्यांंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळचे कर्नाटक राज्यातील रहिवासी असलेले परंतु हॉटेल व्यवसायानिमित्त बीड येथील रहात असलेले विठ्ठल सिना कोटीयान व त्यांचा भाचा अविनाश आनंद पुजारी हे दोघे आपल्या कारने (क्र. एमएच 23 बीसी/3070) कर्नाटकमधील उडपी येथून 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता नगरमार्गे औरंगाबादला कामानिमित्त निघाले होते.
नेवासा तालुक्यातील नगर – औरंगाबाद महामार्गावरील खडका फाट्याजवळ झोप येत असल्याने हे दोघे पतंजली गेट समोरच्या एका हॉटेलसमोर मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास गाडी उभी करून झोपले होते. याच दरम्यान 3.45 च्या सुमारास तोंड बांधलेल्या तिघांनी हातात चाकू घेऊन गाडीचा दरवाजा उघडला. जीवे मारण्याची धमकी देत पैसे व सोन्याचे दागिने देण्याची मागणी केली. या दोघांनी नकार देताच एका जणाने चाकूने मामाच्या हातावर वार करून जखमी केले. त्यानंतर चोरट्यांनी मामा-भाच्याच्या हातातील साडेचार तोळ्यांच्या 1 लाख 12 हजार 500 रूपयांच्या दोन अंगठ्या बळजबरीने चोरून नेल्या. यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने काही नागरिक व गस्तीवरील पोलिस घटनास्थळी आले. त्यामुळे तिघे चोरटे विना क्रमांकाची मोटारसायकल तेथेच टाकून शेजारील शेतात पळून गेले. पोलिसांनी मोटारसायकल जप्त करून अविनाश पुजारी यांच्या फिर्यादीवरून तिघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.