

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : नवरदेवच्या मिरवणुकीवेळी बदली झालेल्या डीजे वाहनचालकाने ब्रेकवर पाय न देता अचानक क्लसवर पाय दिला. त्यामुळे डीजे वाहनाचा वेग वाढला. आणि हे वाहन नवरदेवाच्या मिरवणुकीत घुसले. या अपघातात डीजे वाहनाच्या चाकाखाली चिरडून नवरदेवाच्या भावकीतील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये आणखी काही जण किरकोळ जखमी झाले होते. त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावामध्ये गुरुवारी (दि.४) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. बाळासाहेब हरिभाऊ खताळ (वय ४८) आणि भास्कर राधु खताळ (वय ७४) दोघेही रा. धांदरफळ खुर्द अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील किसन रंगनाथ खताळ यांच्या मुलाचे शुक्रवारी (दि.५) संगमनेर तालुक्यातील रणखांब येथे लग्न आहे. त्यानिमित्ताने गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नवरदेवाची डीजेच्या दणदनाटात वाजत गाजत संपूर्ण गावातून मिरवणूक निघाली होती. यावेळी अचानक मिरवणुकीतील डीजे वाहन (क्र .एम.एच 16/ए.ई. 2097) चालकांमध्ये अदलाबदली झाली. आणि नव्याने चालक म्हणून बसलेल्या युवकाने अचानक डीजे वाहनाच्या ब्रेकवरती पाय देण्याऐवजी क्लसवर पाय दिल्याने अचानक वाहनाचा वेग वाढला. डीजे वाहन मागे येत असताना डीजेच्या चाकाखाली बाळासाहेब खताळ आणि भास्कर खताळ हे दोघे सापडले. त्यात बाळासाहेब खताळ यांचा डीजेच्या चाकाखाली चिरडून जागेवर मृत्यू झाला. तर भास्कर खताळ यांना तरुणांनी चाकाच्या घालून ओढून बाहेर काढले. आणि त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचाराच्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये पाच ते सहाजण किरकोळ जखमी झाले होते. मात्र त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र गंभीर जखमी असलेले अभिजीत संतोष ठोंबरे (वय २२) रामनाथ दशरथ काळे यांच्यावर (वय ५५) संगमनेर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
धांदरफळ खुर्दला डीजे वाहनाचा अपघात झाला असल्याची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, संगमनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे, पो. कॉ. अमित महाजन घटनास्थळी दाखल झाले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यानंतर पोलिसांनी डीजे जप्त केला.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द आणि रणखांब या दोन गावांत लग्नाच्या निमित्त धामधुम चालू होती. मात्र या अपघातामध्ये नवरदेवाच्या भावकीतील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आनंदाच्या क्षणावर विरजन पडले.
हेही वाचा :