

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी वाळू उपशाविरोधात कारवाई सुरू केली आहे. आर्वी व अजनुज येथे सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा करत असलेल्या बोटी पकडून तहसीलदारांनी 20 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात रात्रंदिवस वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसिलदार मिलिंद कुलथे यांना समजली. त्यानुसार रविवारी (दि.6) तहसीलदार कुलथे व हे पथकासह घटनास्थळी पोहचले. आर्वी व अजनुज या ठिकाणी भीमा नदी पात्रात वाळू उपसा करत असणारी बोट पथकाला दिसून आली.
तहसीलदार यांच्या पथकाला पाहताच बोटीवरील चालक व इतर कर्मचारी पळून गेले. मात्र तहसीलदार यांनी 20 लाख रुपये किमतीच्या दोन्ही बोटी जिलेटीनच्या साहाय्याने नष्ट केल्या. श्रीगोंदा तालुका वाळू उपशाबाबतीत जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. तहसीलदार व पोलिस अधिकार्यांवर 'वॉच' ठेवण्यासाठी वाळू माफियांचे पंटर चौकाचौकात बसून एकमेकांना खबर देतात. यामुळे अवैध वाळुची वाहतूक शहरातून सुरळीतपणे सुरू असते. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानंतर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनीही वाळू तस्करांविरोधात मोहीम उघडली आहे.