नगर : जिल्हा रुग्णालयात अपराध्याची वागणूक ! आशा सेविका, अंगणवाडी सेविकांचा आरोप

नगर : जिल्हा रुग्णालयात अपराध्याची वागणूक ! आशा सेविका, अंगणवाडी सेविकांचा आरोप

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा सरकारी रुग्णालयात आम्हाला अपराध्यांसारखी वागणूक मिळत असल्याचा आरोप अंगणवाडी तसेच आशा सेविकांनी केल्याने खळबळ उडाली आहे. जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणार्‍या सर्व गावांमधील आशा सेविका व अंगणवाडी सेविकांची बैठक प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आली होती. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कर्डिले व डॉ. पूजा आंधळे यांनी मार्गदर्शन करत अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांना गाव पातळीवर काम करताना येणार्‍या अडचणी समजून घेतल्या.

यावेळी गाव पातळीवर काम करत असताना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी कुपोषित बालक, तसेच विविध रुग्णांना नेल्यानंतर त्याचबरोबर इतर कामांसाठी रुग्णालयात गेल्यानंतर तेथील डॉक्टर व कर्मचारी सहकार्य करत नाहीत. उलट आम्हालाच अपराध्यासारखी वागणूक देऊन ज्ञानाचे डोस पाजण्याचे काम केले जाते, असे आरोप करण्यात आल्याने सर्वच अवाक् झाले. यावेळी धनगरवाडी येथील कुपोषित बालकास पोषण पुनर्वसन केंद्रात उपचारार्थ दाखल करताना देखील हाच अनुभव आल्याचा धनगरवाडी येथील अंगणवाडी सेविकांनी सांगितले.

आम्ही गाव पातळीवर काम करत असून, खूप अडचणी येतात. अशिक्षित, अडाणी कुटुंबातील व्यक्तींना कितीही समजावून सांगितले तरी ते ऐकत नाहीत. अथक प्रयत्न करून त्यांना उपचारासाठी नेल्यानंतर जिल्हा रुग्णालयात मिळणारी अशी वागणूक, यामुळे काम कसे करावे, असा प्रश्न पडतो. आम्ही घरचे काम करत नसून, समाजातील गोरगरीब नागरिकांसाठी जनजागृती तसेच विविध आजारावर वेळीच उपचार मिळाले, तर होणारे फायदे सांगत असतो. ते काम शासनाचेच असून जिल्हा रुग्णालयाचे सहकार्य होत नसल्याची तक्रार अंगणवाडी व आशा सेविकांनी केली आहे. अंगणवाडी तसेच आशा सेविका या ग्राऊंड लेव्हलवर शासनाचेच काम पाहत असून, त्यांना जिल्हा रुग्णालयाचे सहकार्य मिळत नसल्यास सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे काय होत असेल असा सवालही उपस्थित करण्यात आला.

जिल्हा रुग्णालयात सहकार्य मिळावे
अंगणवाडी तसेच आशा सेविका या वाड्या-वस्त्यांवर हिंडून गरोदर माता, कुपोषित बालके यांच्यासाठी ग्राऊंड लेव्हलवर काम करतात. काही प्रकरणात रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागते. अशावेळी तेथील कर्मचार्‍यांकडून अंगणवाडी व आशा सेविकांना सहकार्य मिळणे गरजेचे आहे, असे डॉ. योगेश कर्डिले यांनी सांगितले.

मदतीऐवजी उपदेशाचे डोस
आदिवासी समाजातील कुपोषित बालकास जिल्हा रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रात उपचारार्थ घेऊन गेलो होतो. तेथील महिला डॉक्टर व कर्मचार्‍यांनी मदत करण्याऐवजी आम्हाला ज्ञानाचे डोस पाजले. सहकार्य करण्याऐवजी आमच्याच कामावर ताशेरे ओढले, असे अंगणवाडी सेविका आशा गवळी, शांता आढाव यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news