

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : नगर-पुणे महामार्गावर अचानक लागलेल्या आगीत ट्रॅव्हल बस जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. चालकाने प्रसंगावधान दाखवित सर्व प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठी जीवीतहानी टळली. महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात शनिवारी (दि.25) पहाटे 5 च्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत सुपा पोलिसांनी सांगितले की, ट्रॅव्हलचालक विलास गुलाब जुमडे (रा. खामगाव, जळगाव) हे आरजे ट्रॅव्हल बसने (एमएच 29 – एडब्लयू 5455) जळगाव येथून 30 प्रवासी घेऊन पुण्याकडे निघाले होते. नारायणगाव येथे आल्यावर अचानक गाडीमध्ये शॉर्टसर्किट झाले व आग लागली. बस चालकाच्या हे लक्षात येताच त्यांनी तात्काळ सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरविले. त्यांना दुसर्या बसने पुण्याला पाठवून दिले.
घटनेची माहिती समजताच सुपा पोलिस ठाण्याचे कर्मचारी रमेश शिंदे, शेरकर, 108 रुग्णवाहिका घेऊन चालक शिवाजी औटी व डॉ.नरेंद्र मुळे, तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील माळी, पाटील, बागुल हे अग्निशामक दलाची गाडी घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवाशांना मदत केली.
तसेच, आग लागलेली बस विझविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु, बस पूर्ण जळून खाक झाली. नंतर क्रेनच्या मदतीने जळालेली बस रस्त्याच्या बाजूला काढण्यात आली.