नगर : व्यापार्‍यांचा ठिय्या, बाजारपेठ कडकडीत बंद

नगर : व्यापार्‍यांचा ठिय्या, बाजारपेठ कडकडीत बंद
Published on
Updated on

नगर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारात शुक्रवारी दोन व्यापार्‍यांवर जीवघेणा हल्ल्याचे तीव्र पडसाद शनिवारी पहायला मिळाले. व्यापरी वर्गाने आपले उद्योग व्यवसाय बंद ठेवून झालेल्या घटनेवर अंसतोष व्यक्त केला. त्यासोबतच कापड बाजारातील अतिक्रमण काढण्याची कारवाई जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ठिय्या देण्याचा पवित्रा व्यापार्‍यांनी घेतला होता. या बंदला राजकीय पक्ष तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभाग घेतला होता.

दीपक ऊर्फ गुड्डू नवलानी, प्रणील बोगावत या दोन व्यापार्‍यांवर शुक्रवारी (दि.14) सायंकाळी जीवघेणा हल्ला झाला. या घटनेमुळे कापड बाजारात एकच खळबळ उडाली होती. नवलानी यांचे कापड बाजारात कपड्याचे दुकान असून, दुकानामागे त्यांचे गोडावून आहे. त्याच गोडावूनच्या समोर आरोपी हमजा शौकतअली शेख याचे दुकान आहे

. त्या दुकानासमोर शेख याने गेट बसविल्याने व्यापारी दीपक नवलानी यांना गोडावून मध्ये जाण्यास अडचण होत होती. गेट उघडे ठेवण्यावरून नवलानी व शेखमध्ये वाद झाला होता. त्यानंतर सायंकाळी अमर हमीद शेख याने नवलानी व बोगावत यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात नवलानी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, व्यापारी वर्गाने या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी शनिवारी कडकडीत बंद पाळला. कापड बाजारात व्यापार्‍यांनी एकजूट दाखवत हल्लाचा निषेध नोंदविला. व्यापार्‍यांच्या बंदला राजकीय पक्षाचे नेते, हिंदुत्वादी संघटनांनी पाठिंबा देत ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदविला. खासदार सुजय विखे, आमदार संग्राम जगताप यांनी आंदोलनस्थळी भेट देत व्यापार्‍यांवरील हल्ल्याचा निषेध नोंदविला. व्यापार्‍यांवरील हल्ल्यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे ? याचा तपास पोलिसांनी करून अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी ठोस कारवाई करावी, असे आमदार संग्राम जगताप बोलताना म्हणाले. खासदार सुजय विखे यांनी हॉस्पिटल मध्ये जावून जमखींची भेट घेतली.

खा.विखे व आमदार जगताप यांच्या मध्यस्थीनंतर व्यापार्‍यांनी दुपारी चार वाजताच्या सुमारास आंदोलन मागे घेतले. कापड बाजारात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे, एलसीबीचे प्रमुख दिनेश आहेर, कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तोफखान्याचे निरिक्षक मधुकर साळवे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित होते.

चार आरोपींवर गुन्हा दाखल
जखमी दीपक नवलानी यांच्या जबाबावरून चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तत्काळ दोन जणांना अटक केली होती. अमर हमीद शेख, रिजवान अमिन सय्यद या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर आरोपी हमजा शौकत अली शेख व त्याचा भाऊ हे दोघे फरार आहेत. अटकेतील दोन्ही आरोपींना न्यायालयात शनिवारी हजर केले असता त्यांना 17 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांनी गेट हटविले
व्यापारी नवलानी यांच्या दुकानाजवळील असलेले गेट पोलिसांनी शनिवारी हटविले. हे गेट हटविल्यानंतर आंदोलकांनी मोचीगल्ली, घासगल्ली येथील अतिक्रमण काढण्याची मागणी लावून धरली. अतिक्रमण काढले जात नाही, तोपर्यंत ठिय्या देण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती. पोलिस प्रशासनाने महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्याची फोनवरून संपर्कही केला होता. परंतुु, अतिक्रमण हटविल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

घासगल्लीतील अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न
घासगल्ली येथील अतिक्रमण काढण्याचा प्रयत्नात काही आंदोलक असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना अडवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

अतिक्रमण हटविण्यास सुरूवात
महापालिका अतिक्रमण विभागाने वरिष्ठांच्या सूचनेनुसार कापड बाजार व शहाजी रस्त्यावरील अतिक्रमण हटविले आहेत. त्यात दोन हातगाड्या व चार फ्लेक्स फोर्ड जप्त केले आहेत. आणखी दोन दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे, असे अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले.

आ.जगताप, व्यापार्‍यांनी घेतली एसपींची भेट
कापड बाजारात व्यापार्‍यांचे ठिय्या आंदोलन सुरू असतानाच आ.संग्राम जगताप व व्यापारी वर्गाच्या शिष्टमंडळाने एसपी राकेश ओला यांची भेट घेतली. कापड बाजारात असलेले अतिक्रमन काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पोलिस अधीक्षक कार्यालयात शेकडो व्यापार्‍यांनी धाव घेत घटनेचा निषेध नोंदवत एसपींना निवेदन दिले. अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस प्रशासन सहकार्य करेल तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई होईल, असे आश्वासन यावेळी पोलिस अधीक्षक ओला यांनी व्यापार्‍यांना दिले. आ.संग्राम जगताप, व्यापारी महेश मध्यन, दामोदर बठेजा, श्याम देवगावकर, रमेश तनवाणी, हरिभाऊ डोळसे, हरेश मध्यन यांच्यासह मोठा व्यापारी वर्ग उपस्थित होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news