नगर : कांदा लागवड अंतिम टप्प्याकडे

नगर : कांदा लागवड अंतिम टप्प्याकडे
Published on
Updated on

शंकर मरकड : 

भातकुडगाव : सध्या उन्हाळी हंगाम कांदा लागवडीची लगीनघाई शेतशिवारात सुरू आहे. गेल्या एक-दीड महिन्यापासून सुरू असलेली कांदा लागवड या आठवड्यात अंतिम टप्प्याकडे जाणार आहे.  चालू प्रत्येक शेतकर्‍याने दुकानातील किंवा घरीच तयार केलेेले कांद्याचे बी वापरून आपल्या शेतामध्ये रोपवाटिका तयार केली. दोन वर्षांपूर्वी रोपाचे भरपूर पैसे झाल्यामुळे चालू वर्षी अनेक शेतकर्‍यांनी रोप विकेल, या आशेने जास्तीचे बी टाकले. मात्र, मागील वर्षी कांद्याला इच्छित बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी वर्गाने कांदा लागवडीचे क्षेत्र यंदा कमी केल्याने प्रत्येक शेतकर्‍याकडे सध्या कांद्याचे रोप शिल्लक आहेत.

सोशल माध्यमातून वा फोन करून प्रत्येक शेतकरी नातेवाईक, गावकरी यांना म्हणतोय की, कांद्याची लागवड करायची असली तर रोप घेऊन जा. हे रोप माफक दरात, काही ठिकाणी मोफतही उपलब्ध आहे. अशी परिस्थिती असली तरी, अपवाद वगळता कोणी रोप नेण्यास कोणी तयार नसल्याने अनेक शेतकर्‍यांना उरलेले कांदा रोप बांधावर फेकून देण्याची वेळ आली आहे.  त्यामुळे शेतकरी वर्गाचा बी, खते, औषधे, मशागत व मेहनतीचा खर्च वाया जाणार आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक ढगाळ वातावरण, धुके याचा सामना करत जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकरी वर्ग कांदा लागवड उरकण्याच्या गडबडीत आहेत.

मिरचीचे आंतरपीक घेणार : करंडे

दरवर्षी पारंपरिक वाफे पध्दतीने कांदा लागवड केली जाते. यंदा मात्र उत्पादन वाढीसाठी बेड पध्दतीचा अवलंब केला आहे. कांद्याचा बाजारभाव बेभरवशाचा आहे. त्यामुळे दोन्ही बेडच्या मध्ये मोकळे असलेल्या नालीत मिरची लागवड करणार आहे. आंतरपीक घेऊन उत्पादन वाढविण्याचा हेतू आहे, असे भाविनिमगावचे युवा शेतकरी गणेश करंडे यांनी सांगितले.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

चालू वर्षी कांदा लागवड करण्यासाठी एकरी दहा ते बारा हजार रुपये दर आहे. तर, रोप उपटून लावण्यास बारा ते चौदा हजार रुपये खर्च मजूर घेत आहेत. त्यामुळे यांत्रिक पद्धतीने कांदा लागवडीस प्राधान्य दिले आहे. ती फायद्याची ठरत आहे. बेड व वाफा पद्धतीने लागवड केली जाते आहे, असे शहरटाकळीचे प्रगतशील शेतकरी आबासाहेब राऊत यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news