नगर : पुढारी वृत्तसेवा : नवीन वर्षातील पहिला सण असणार्या मकरसंक्रांतीसाठी तिळगुळ, हळदी-कुंकवाच्या वस्तूसह वाणाचे साहित्य खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेत महिलांची गर्दी वाढली आहे. त्यातच, गतवर्षिच्या तुलनेत तिळाच्या दरात 40 ते 50 रूपयांनी वाढ झाल्याने तिळगुळाच्या लाडूतही 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा मकरसंक्रांतीच्या सणावर महागाईचे सावट असल्याचे चित्र आहे. भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा असलेला मकरसंक्रांतीचा सण रविवारी साजरा होणार आहे. तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकरसंक्रांत.
या दिवशी 'तीळगूळ घ्या, गोड गोड बोला' असा संदेश देत प्रेम, आपलुकी शिवाय एकमेकांविषयी आदर व्यक्त करण्याची प्रथा आहे. मकरसंक्रांती निमित्ताने बाजारात सुगडी त्याचबरोबर विविध प्रकारचे वाण, तिळगुळाचे लाडू बाजारामध्ये विक्रीला आहे. त्यासोबतच रेडिमेड तीळगूळ, तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या तसेच गुळाची रेवडी, हलवा खरेदी जोमात सुरु झाली आहे. हळदी कुंकवाचे वाण खरेदीसाठी विविध आकर्षक वस्तू खरेदी करण्यासाठी शहरातील चितळे रोड, प्रोफेसर कॉलनी चौक या परिसरात ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. चमचे, वाटी, सोप केस, डब्बे, कुंकवाचा कंरडा अशा रोजच्या वापरात येणार्या वस्तूची खेरदी होत आहे. सुवासिनींचा मकरसंक्रात हा महत्त्वाचा सण असल्याने या दिवशी वाणाला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे वाण घेण्यासाठी व तिळगुळ वाटण्यासाठी खणाची आवश्यकता असल्याने खरेदीसाठी गर्दी होत आहे. दरम्यान, सर्वच प्रकारचे साहित्य महागले असले तरी खरेदीसाठी बाजारात नागरिकांचा उत्साह टिकून असल्याचे पहायला मिळत आहे.
हलव्याच्या दागिन्यांना मागणी
मकरसंक्रांतीला विशेष मान हलव्याच्या दागिन्यांना असतो. हलव्याच्या दागिन्यांमध्ये मुकुट, बाजूबंद, अंगठी, झुमके वेल, झुमके आदी दागिने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
मकरसंक्रांतीच्या काळात तिळाला मागणी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे दरवर्षिच तिळाचे दर संक्रांतीच्या काळात वाढत असतात. यंदा दोन महिन्यापूर्वीच 40 ते 50 रूपयांनी तिळाच्या दरात वाढ झाली.
-प्रकाश खुबचंदानी, किराणा व्यावसायिक, तारकपूर