

नगर; पुढारी वृत्तसेवा : आगामी काळात उदभवणार्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागविलेल्या टँकर निविदेला तीन मोटार वाहतूकदार संस्थांनी प्रतिसाद दिला आहे. टँकरचा ठेका कोणत्या संस्थेला मिळणार याचा फैसला मात्र, सोमवारी होणार आहे.
पाऊस भरपूर झाला तरीही एप्रिल व मे या दोन महिन्यांत जिल्ह्यातील संगमनेर, नगर, पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा या तालुक्यांतील काही मोजक्या गावांत पाणीटंचाईच्या झळा बसतात. त्यामुळे 40 ते 50 गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी म्हणून टँकरसाठी निविदा मागविल्या. पहिल्या वेळेस प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने निविदेला मुदतवाढ दिली. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दुसर्यांदा टँकर निविदेला मुदतवाढ दिली असता तीन निविदा दाखल झाल्या आहेत.
येत्या सोमवारी निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. या दिवशी पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्याचा ठेका कोणत्या मोटार वाहतूकदार संस्थेला मिळतो, याकडे लक्ष लागले आहे. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे अद्याप 70 टक्के भरलेली आहेत. भूजलपातळी देखील चांगली आहे. त्यामुळे यंदा देखील 50 ते 60 गावांना पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. पावसाळा लांबल्यास मात्र, टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.