नगर-मनमाड रस्त्यावरील अपघातात महिलेसह तीन बैल ठार

नगर-मनमाड रस्त्यावरील अपघातात महिलेसह तीन बैल ठार
Published on
Updated on

कोपरगाव ; पुढारी वृत्तसेवा : अज्ञात ट्रकने ऊसतोडणी कामगारांच्या तीन बैल गाड्यांना दिलेल्या धडकेत बैलगाडीवरील तरुण महिला व तीन बैल जागीच ठार झाले असून याच अपघातात आणखी एक पुरुष व महिला आणि दोन बैल जखमी झाल्याची घटना गुरुवारी नगर-मनमाड महामार्गावरील कोपरगाव तालुक्यात घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचा ऊस तोडणी कामगारांच्या सात गाड्यांचा ताफा कारखाना येथून येसगाव नाटेगाव शिवारात ऊस तोडणीसाठी गुरुवारी पहाटे बैलगाड्या घेऊन जात होत्या, दरम्यान सहा वाजेच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गावरील येसगाव शिवारातील साई लॉन समोर भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात ट्रकने लागोपाठ तीन बैलगाडयांना जोराची धडक दिली.

या अपघातात ऊस तोडणी महिला कामगार मोनाबाई दादाजी पवार (२७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दादा अकडू पवार व कल्याबाई सुभाष अहिरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नाईकवाडे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या दुर्घटनेमध्ये तीन बैलांचा जागीच मृत्यू झाला तर दोन बैलही जखमी झाले. या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेची माहिती समजताच अमृत संजीवनीचे ट्रान्सपोर्ट अधिकारी केशवराव होन घटनास्थळी हजर झाले. होन यांनी सदर घटनेची माहिती कारखान्याचे सरव्यवस्थापक यांना भ्रमणध्वनीवरून दिली.

कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश आव्हाड, हवालदार अशोक आंधळे हे घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी कोल्हे कारखान्याची रुग्णवाहिकेसह कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत मदत केली. बैलगाड्यांना दिलेल्या धडकेनंतर ट्रक वेगाने निघून गेला असला तरी हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news