नगर-दौंड मार्गावर दिवसात तीन अपघात

नगर-दौंड मार्गावर दिवसात तीन अपघात

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगर-दौंड महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सुरू अपघातांची मालिका थांबताना दिसत नाही. नगर तालुक्यातील खंडाळा गावाजवळ गुरुवारी (दि.12) दुपारी, तर थोड्या – थोड्या अंतराने तीन अपघात झाले. खंडाळा व बाबुर्डी बेंद, जवळ गेल्या दोन दिवसांतील अपघातांची संख्या आता पाच झाली आहे. वाढत्या अपघातांमुळे हा महामार्ग दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला असून, तो मृत्यूचा सापळा बनला आहे. नगर-दौंड महामार्गावर खंडाळ्याजवळ सोमवारी (दि.9) पहाटे 5.30च्या सुमारास मोटारसायकलवर दोन कॅरेट संत्रा भरून मार्केटला निघालेल्या तरुणाला मागून भरधाव वेगात आलेल्या मुरूमाच्या ढंपरने जोराची धडक दिली. या धडकेत तो उडून रस्त्याच्या खाली पडला. तर, ढंपर प्रचंड वेगात असल्याने तो उलटून 250 फूट घासत जाऊन रस्त्यावर आडवा झाला. दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

यानंतर बाबुर्डी बेंद गावाजवळ असलेल्या घोसपुरी फाट्यावर मंगळवारी (दि.10) रात्री 9.15 वाजता एस.टी. बस व मालवाहू पिकअपची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने बसमधील सर्व प्रवाशी बालंबाल बचावले. हे दोन अपघात ताजे असताना गुरुवारी (दि.12) दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास खंडाळा गावाजवळ असलेल्या वाळकी फाट्यावर रस्ता ओलांडणार्‍या मोटारसायकलला भरधाव वेगात आलेल्या कारने जोराची धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. देवराम देवकर व उत्तम देवकर (दोघे रा.चास, ता.नगर), अशी त्यांची नावे आहेत.

त्यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या पाठोपाठ थोड्या वेळाने कार्लेवस्ती समोर भरधाव वेगात चाललेली कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अचानक उलटली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. यानंतर थोड्या वेळाने मोटारसायकलवर नगरहून श्रीगोंद्याकडे जाणारे दोघे एका कारवर जावून आदळले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातग्रस्तांना तातडीने मदत
संदेश कार्लेंमुळे अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळाली. खंडाळा गावाजवळ दुपारी अपघात होताच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघा जखमींना त्यांच्या इनोव्हा कारमधून नगरच्या रुग्णालयात पोहोच केले. त्यामुळे त्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळू शकले. त्यानंतर दुपारी झालेल्या अपघातात जखमी श्रीगोंदा येथील दोघा मोटारसायकल स्वारांनाही संदेश कार्ले यांनी रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली. दिवसभरात चार अपघातग्रस्तांना संदेश कार्लेंमुळे तातडीने मदत मिळाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news