मृत्यूचा सापळा आता अंतिम प्रवासातही अडसर, अंत्यविधीसाठी जाणार्‍यांना चिखलातून वाट

मृत्यूचा सापळा आता अंतिम प्रवासातही अडसर, अंत्यविधीसाठी जाणार्‍यांना चिखलातून वाट

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : कल्याण-निर्मल (विशाखापट्टणम्) राष्ट्रीय महामार्ग लोकांसाठी मृत्यूचा सापळा ठरला असतानाच, आता अंतिम प्रवासातही अडसर ठरत आहे. पुलाच्या कामासाठी पोळा मारुती मंदिराजवळून काढण्यात आलेल्या बाह्यवळणामुळे पुलाजवळील हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही स्मशानभूमित अंत्यविधीसाठी जाणार्‍यांना चिखलातून वाट काढावी लागत आहे.
ठेकेदाराने पुलाच्या कामासाठी सुमारे 3 ते 4 किलोमीटर लांबून बाह्यवळण रस्ता सुरू केला. हा मार्ग मुख्य वाहतुकीचा आहे. मोहटादेवीला येणारे बहुतांश भाविक याच रस्त्याचा वापर करतात. रस्ता बंद केल्याने वाहतूक पाथर्डीतून खोलेश्वर मंदिर, चिंचपूर रोडवरील शनिमंदिरमार्गे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळून तनपुरवाडी फाट्याला मिळते.

तेथून वाहनधारक मराठवाड्याकडे जातात. मराठवाड्याकडून येणारी वाहने कोणताही सूचना फलक नसल्याने थेट फुलाच्या कामापर्यंत येतात. तेथून पुन्हा माघारी जाऊन त्यांना बाह्यवळण रस्त्याने जावे लागते.  पोळा मारुती मंदिर ते तनपुरवाडी फाटा दरम्यानची दुकाने, पेट्रोल पंप, मंगल कार्यालय, हॉटेल व वन्य व्यावसाय ठप्प झाले आहेत. मातीचे ढिग टाकून रस्ता बंद केला आहे. दुचाकीस्वारांना ढिगार्‍यांवरून जीवघेणा प्रवास पुलाजवळील खोल खड्ड्याजवळून करावा लागतो. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून खासदार डॉ. सुजय विखे यांनी अनेक बैठका घेतल्या. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही.

या कामाबाबत लोकांना नादी लावण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. तालुक्याला कोणी वाली आहे की नाही, असा सूर प्रवाशांमध्ये आहे. खासदार, आमदारांनाही आता सोशल मीडियावर टीकेचे धनी व्हावे लागत आहे. मेहकरी फाटा ते फुंदे टाकळीपर्यंतच्या प्रवाश्यांच्या तोंडी अक्षरश: अर्वाच्च शब्द येतात.

संबंधित ठेकेदाराने हे पूल बनवण्यासाठी एक वर्ष घातले आहे. अद्याप पूल तयार नाही. पावसाळ्यात पुलाचे काम काढून रस्ता बंद केला. ठेकेदार हे काम करण्यास सक्षम नसून कामाला दर्जाही नाही.
                                                                           – उदय गर्जे पेट्रेाल पंप चालक

आमदार, खासदारांनी लक्ष घालावे आणि या रस्त्याचा तिढा कायमचा सोडवावा. या कामाकडील दुर्लक्षाचा वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. ठेकेदाराचे कोणतेही नियोजन नाही.
                                                                       – विजय बोरुडे माजी सरपंच

गणेशोत्सवातल्या देखाव्यांतही रस्त्यावरील खड्डे
राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे हा रस्ता बहुचर्चित झाला आहे. रस्त्याची व्यथा सार्वजनिक गणेशोत्सवात गणेश मंडळांनी देखावा व पथनाट्यांच्या माध्यमातूनही मांडून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news