सहा भाषा बोलणारे चोरटे त्रिकूट! महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत गुन्हे दाखल

सहा भाषा बोलणारे चोरटे त्रिकूट! महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत गुन्हे दाखल
Published on
Updated on

अमोल कांकरिया

पाथर्डी तालुका : परराज्यातील टोळी…या टोळीला जवळपास सहा भाषा बोलता आणि लिहिता येतात..ते ज्या ठिकाणी जायचे, तेथील भाषेचा उपयोग करत असत. पाथर्डीत अशाच एका घटनेत त्यांनी अलिशान गाडीत बसलेली महिला अन् तिची नात यांना 'तुमचे पैसे पडले आहेत,' असे म्हणत गाडीतील पैशांची बॅग पळविली होती. तेव्हापासून पाथर्डी पोलिस त्यांच्या शोधावर होेते. अखेर सात महिन्यांनंतर पोलिसांनी परभणी जिल्ह्यातून अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, 1 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

शंकर उर्फ शिनू पी लक्ष्मण तेलुगु (वय 25, कर्नाटक ), व्यंकटेश उर्फ विनय कृष्णा रेड्डी (वय 30, तामिळनाडू) या सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. आरोपी पूर्वी बंगळूरच्या बसस्थानकावर पाकीटमारी व छोट्या-मोठ्या चोर्‍या करत असत. नंतर त्यांनी राज्यांराज्यात चोर्‍या करण्यास सुरुवात केली. पाथर्डी येथील जुन्या बसस्थानकावर 17 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी तेलुगु व रेड्डी यांच्यासह एक अनोळखी व्यक्ती, अशा तिघांनी ऊसतोड कामगार कैलास श्रीराम पवार (रा. वाघदरा, ता. पाथर्डी) यांच्या चारचाकी गाडीच्या डिक्कीतून अडीच लाखांची बॅग लंपास केली होती. वाहनातून पैसे बाळगणार्‍या लोकांचे पैसे चोरी करण्यात हे आरोपी सराईत आहेत.

कैलास पवार यांच्या गाडीतील डिक्कीमध्ये ठेवलेले अडीच लाख रुपये या आरोपींनी मोठ्या शिताफीने लांबविले होते. पवार हे गाडी सोडून दुकानात गेले, त्यावेळी गाडीमध्ये त्यांची बहीण व त्यांची नात होती. त्यावेळी आरोपींनी 'तुमचे पैसे खाली पडले आहेत, तुम्ही ते उचलून घ्या' असा बनाव करून ते अडीच लाख रुपये काही क्षणातच लांबविले होते. गुन्हा केल्यानंतर हे आरोपी 'सीसीटीव्ही'त कैद झाले होते. मात्र, परराज्यातील आरोपी अनोळखी असल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.

पाथर्डी पोलिसांनी राज्यातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये हे'सीसीटीव्ही' फुटेज व आरोपींच्या वर्णनाची माहिती दिली होती. या आरोपींच्या शोधासाठी पाथर्डी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपी मिळून आले नाहीत. वेगवेगळ्या भाषा बोलता येत असल्याने ते त्या-त्या ठिकाणी सहज मिसळत असत. परभणी जिल्ह्यात एका गुन्ह्यात या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. याची माहिती मिळताच तेथून त्यांना ताब्यात घेऊन अटक केले.

पाथर्डी पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीश मयूर गौतम यांनी 1 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत डांगे, पोलिस कर्मचारी सचिन गरगडे, संदीप बडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

आरोपींना येतात या भाषा
टोळीतील आरोपींना इंग्रजी, तेलगू, कन्नड, मल्याळम्, हिंदी आणि मराठी अशा भाषा येतात. या भाषांचा वापर ते चोरी करताना करत असत.

त्यांच्यावर या ठिकाणीही गुन्हे दाखल
मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, नगर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी ज्या ठिकाणी चोरी केली, त्या ठिकाणी पुन्हा ते चोरी करत नसत किंवा फिरकतही नसत.

पैसे घेऊन जाणार्‍यांवर ठेवत पाळत!
बँकेतून अथवा दुकानातून घेतलेली रक्कम वाहनातून बाळगताना, हे आरोपी त्या व्यक्तीवर सुरुवातीपासून पाळत ठेवत असत. यानंतर ज्या ठिकाणी संधी मिळेल, तेथून वाहनातील रक्कम लंपास करत. पाथर्डीच्या घटनेतही या आरोपींनी चारचाकी गाडीतील संबंधित व्यक्ती हा बाहेर गेल्यानंतर ही चोरी केली होती.

रक्कम लंपास होईपर्यंत पाठलाग!
एखादी व्यक्ती मोठी रक्कम घेऊन दुचाकी व चारचाकीमधून प्रवास करत असल्यास, त्या ठिकाणापासून त्याचा जोपर्यंत ती रक्कम लंपास करता येत नाही, किंवा त्यांना संधी मिळत नाही, तोपर्यंत आरोपी दहा ते वीस किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग करायचे, अशी माहिती उघड झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news