

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील निंभेरे येथे असलेल्या आंधळे वस्तीवर दिनांक 20 मार्च रोजी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ठिकाणी घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी निंभेरे ग्रामस्थांनी केली.
निलेश भीमराज आंधळे (वय 25, रा. आंधळे वस्ती, निंभेरे, ता. राहुरी) हा तरुण दिनांक 19 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घराचे बाहेर असलेल्या गोठ्यामध्ये झोपला होता. दिनांक 20 मार्च रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास निलेश आंधळे याला वस्तीवर चोर आल्याची माहिती मिळाली. तेव्हा त्याला घराशेजारील खोलीचे कुलूप तोडून तेथेच खाली पडलेले दिसले. त्याने खोलीत जाऊन पाहिले असता घरातील सामानाची उचकापाचक केलेली दिसली. लोखंडी पेटीमध्ये ठेवलेले 25 हजार रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसले.
यानंतर निलेश आंधळे हा त्याच्या घराशेजारी राहणारे त्याचे चुलते राजेंद्र पंढरीनाथ आंधळे यांना उठविण्यासाठी गेला असता त्यांचे घराचे किचनचा दरवाजा उघडा दिसला. राजेंद्र आंधळे यांना आवाज देऊन उठवले. ते जागे झाल्यानंतर त्यांच्या घरातील सामानाची उचकापाचक केल्याचे दिसले. चोरट्यांनी डब्यातील 5 हजार रुपये रोख रक्कम व 15 हजार रुपये किमतीचे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी चोरून नेल्याचे लक्षात आले.
यानंतर निलेश आंधळे याने वस्तीवरील लोकांना उठवले असता दिलीप सोपान साबळे यांच्या घरात त्यांची आई लक्ष्मीबाई सोपान साबळे यांची 15 हजार रुपये किंमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची नथ चोरुन नेल्याचे त्यांच्याकडून समजले. त्यानंतर आंधळे वस्तीवरील लोक जागे झाल्यानंतर त्यांनी आजू बाजूला चोरांचा शोध घेतला. मात्र चोर निघून गेले होते.
या घटनेत 30 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम सोन्याचे दागीने व 30 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 60 हजार रुपए किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. निलेश भीमराज आंधळे याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.