नगर : कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या कोपरगावी पाऊसच नाही..!

नगर : कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या कोपरगावी पाऊसच नाही..!
Published on
Updated on

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन- जुलै हे पावसाचे मुख्य दोन महिने संपले तरी कोपरगावकरांवर पाऊस रूसलेलाच आहे. बळीराजा दररोज सकाळी उठून आभाळाकडे टक लावून चातकासारखे पाहतो आहे. पंजाबराव डख व भारतीय हवामान खात्याच्या प्रत्येक बातमीकडे त्याचे कान आसुसलेले आहेत. पाऊस पडावा, यासाठी ग्रामीण भागात महिला डोक्यावर पाण्याने भरलेले कलश घेवुन महादेवाला साकडं टाकून शाळुका पाण्याने झाकुन ठेवत आहेत. जेमतेम पावसावर पेरलेली पिके जगणार की नाही, याची चिंता, दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांपुढे उभे ठाकले आहे. एके काळचा कॅलिफोर्निया अशी सदाबहार ओळख असलेला कोपरगाव तालुका आज मात्र पावसाची चातकासारखी वाट पहात आहे. दरम्यान, धरण क्षेत्रांमध्ये पाऊस पडत असल्याने गोदामाई दुथडी भरुन वाहत असल्याचा विरोधाभास दिसत आहे.

कॅलिफोर्निया अशी ओळख असलेला कोपरगाव तालुका गेल्या दोन-तीन वर्षांपासून अस्मानी-सुलतानी संकटाशी मुकाबला करीत आहे. अशातच मागील वर्षी खरीप व रब्बी दोन्ही हंगाम पाण्यात गेले. वर्षभर पाऊस पडला तर आता पावसाळ्यातचं पावसाने डोळे वटारले आहेत. तालुक्यात जून महिन्याच्या दुसर्‍या व तिसर्‍या आठवड्यात झालेल्या पावसाने बहुतांश शेतकर्‍यांनी पेरण्या उरकल्या. पावसाच्या जिवावर पेरणी केली होती, मात्र त्याने अचानक ओढ दिल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जून महिन्यात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी आनंदात होता, परंतु आता अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारली. यामुळे उगवलेली पिके पाऊस नसल्याने सुकू लागली आहेत. परिसरात शेतकर्‍यांनी खरिपाच्या पिकाची लागवड व पेरणी पूर्ण केली. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रामध्ये शेतकरी सापडला आहे.

यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने नैसर्गिक संकटाचे सावट तालुक्यावर अद्यापही कायम आहे. सध्या ऊन-सावलीचा खेळ अन् सोसाट्याचा वारा सुरु आहे. यामुळे शेतकर्‍यांचे काळीज तुटत आहे. गत आठ ते दहा दिवसांपासून रिमझिम पावसाने तालुक्याच्या शेतकर्‍यांच्या डोक्यावर नैसर्गिक संकटांची टांगती तलवार कायम आहे. यावर्षी तरी निसर्ग आपली अवकृपा दाखविणार नाही, अशी आशा शेतकरी बाळगून आहे. मात्र, आठ दिवसांपासून पाऊस न झाल्याने पिके सुकू लागली आहेत. दरम्यान, जुलै महिनासुद्धीा संपण्याच्या उंबरठ्यावर आलेला असताना मोठा पाऊस झाला नाही.

तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे. गतवर्षी वर्षभर पाऊस अन् यंदा मात्र आकाशाकडे डोळे लागले आहेत. दोन- तीन दिवसांपासून नुसते वारे वाहतात. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. अजूनही म्हणावा तसा पाऊस न झाल्याने शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडली आहे.

जूनच्या सुरवातीला जो काही थोडासा पाऊस झाला, त्यावर शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या, परंतु त्यानंतर पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. विहिरींनी तळ गाठला. प्यायला देखील पाणी नाह अशी काही बिकट परिस्थिती आहे. दोन- चार दिवसात पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट आहे. अशा परिस्थितीत शासनाने बळीराला मदत करायला हवी. परिसरात पेरणी केलेली मका पावसाअभावी ऊन धरू लागली आहे. गोदावर नदीला अजूनही पूर आलेला नाही. आहे तोच जलसाठाही संपत चालला आहे. विहिरींनी तळ गाठण्याच्या उंबरठ्यावर असताना आता कॅलिफोर्निया म्हटल्या जाणार्‍या कोपरगाव तालुक्याला मोठ्या पावसाचे प्रतीक्षा आहे.

हा हंगाम तरी निदान चांगला निघावा, यासाठी शेतकरी मेहनत करीत आहे. त्याला पावसाची साथ हवी आहे. तालुक्यातील ज्या शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या त्यांची पिके उभी आहेत, परंतु पाऊस झाला नाही तर ती तग धरतील का, अशी बिकट परिस्थिती आहे. पाऊस झाला नाही तर द्राक्षबागांसह भाजीपाला पिकांचे नियोजन कसे करायचे, खर्च कसा भागवायचा, यासह अनंत अडचणींचा डोंगर शेतकर्‍यांपुढे निश्चित उभा राहिला आहे. कोपरगाव तालुक्याला आता केवळ पावसाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान, नांदुर मध्यमेश्वर बंधार्‍यातुन गोदावरी नदीतुन 25 जुलैपर्यंत 922 दशलक्ष घनफुट पाणी वाहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news