जवळा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : डोंगरदर्यांनी वेढलेल्या पारनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दीड ते दोन वर्षापासून गुन्हेगारीचा आलेख वाढताच आहे. चोर्या, दरोडे अन भुरट्या चोरीच्या घटनांनी तालुक्यात अगदी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यात कायदा व्यवस्था व विशेषतः महिलांच्या सुरक्षेचे पुरते तीन तेरा वाजले आहेत.
खून, दरोडे, जीवघेणे हल्ले हे तालुक्याला आता नित्याचेच झाले आहे. परंतु यात गुन्हेगार अलगद निसटून जात आहेत. त्यामुळे गुन्हेगार हे पोलिसांपेक्षा वरचढ ठरत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. तपास लावण्यात पिछाडीवर असल्याने, चोरटे जोमात, नागरिक कोमात, तर पोलिस कामात..! अशी अवस्था तालुक्याची निर्माण झाली आहे. सध्या तालुक्यात चोर्या, दरोडे यांचे प्रमाण वाढले आहे. पारनेर पोलिस प्रशासन अॅक्शन मोडवर केव्हा येणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.