

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : अखेर ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा 2 चे पाणी वितरण कुंडात पोहोचले आहे. शेवगाव तालुक्यातील वीस गावांसाठी संजीवनी ठरणारी ही योजना अंतिम टप्प्यात असून, योजनेच्या पाच पैकी दोन वितरण कुंडात पाणी पोहोचून त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. उर्वरित वितरण कुंडांतून पाण्याची चाचणी घेण्यासाठी ताजनापूर उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, उपकार्यकारी अभियंता श्रीहरी कुलकर्णी व त्यांचे सहकारी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
सन 2014 पासून या भागाचे प्रतिनिधित्व करत असताना ताजनापूर उपसा सिंचन योजनेसाठी शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध केला. आतापर्यंत या योजनेसाठी सुमारे 120 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. योजनेचे मुख्य पंपगृह, पोच कालवा, उर्ध्वगामी नलिका, वितरण कुंड यांची कामे पूर्ण झाली आहेत. योजनेच्या वितरण कुंडापुढील पाईप वितरण व्यवस्थेचे काम प्रगतिपथावर असून, जून 2024 अखेर काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे आमदार राजळे यांनी सांगितले.
जायकवाडी जलाशयातून ताजनापूर उपसा सिंचन योजनेसाठी 3 हजार 878 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यापैकी 1 हजार 611 दशलक्ष घनफूट पाणी टप्पा एकसाठी, तर उर्वरित 2 हजार 267 दशलक्ष घनफूट पाणी टप्पा दोनसाठी उपलब्ध आहे. यामध्ये वीस गावांतील 6 हजार 960 हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाचा लाभ होणार आहे. योजनेच्या एमआर 2, एमआर 3 च्या पंपांची यशस्वी चाचणी झाल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लवकरच या योजनेचा लाभ शेतकर्यांना मिळणार असल्याची माहिती आमदार राजळे यांनी दिली.