नगर : ठाकरे-शिंदे गटाने मागितली स्वतंत्र शिवजयंती मिरवणुकीची परवानगी

नगर : ठाकरे-शिंदे गटाने मागितली स्वतंत्र शिवजयंती मिरवणुकीची परवानगी

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : तिथीनुसार होणार्‍या शिवज यंतीसाठी ठाकरे- शिंदे या दोन्ही गटांनी पोलिसांकडे अर्ज करून स्वतंत्र मिरवणूक काढण्याची परवानगी मागितली आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही एकच मिरवणूक काढण्यावर पोलिसांनी दोन्ही गटांचे एकमत करण्याचा प्रयत्न केला. ठाकरे गटाने पोलिसांच्या म्हणण्याला साथ देत सहमती दिली, मात्र वरिष्ठांशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय कळवितो, असे शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे शिंदे गटाच्या निर्णयानंतरच शिव जयंती एकत्र की वेगळी होणार, यावर शिक्कामोर्तब होईल, असे चित्र सध्या दिसत आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळ व शिवजयंती उत्सव समिती दरवर्षी एकत्र मिरवणूक काढते. त्यामुळे मिरवणूक काढण्यासाठी ठाकरे गट व शिव जयंती उत्सव समितीने अध्यक्ष कपिल क्षत्रिय व शहर प्रमुख अमर कतारी यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली तर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने स्वतंत्र मिरवणूक काढण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी शिंदे गट शिवसेना तालुकाप्रमुख रमेश काळे व शहरप्रमुख विकास भरीतकर यांनी पोलिसांकडे केली.

दोन्ही गटांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी पो. नि. राजेंद्र भोसले यांनी ठाकरे व शिंदे या दोन्ही गटांच्या पदाधिकार्‍यांना पोलिस ठाण्यात बोलावून दरवर्षीप्रमाणे यंदाही एकत्र मिरवणूक काढल्यास पोलिस प्रशासनावर जास्त ताण पडणार नाही, असे दोन्ही गटांच्या पदाधिकार्‍यांना भोसले यांनी सांगितले.

एकत्र मिरवणूक काढण्यासाठी आमची कुठली हरकत नसल्याचे ठाकरे गटाचे शहरप्रमुख अमर कतारी म्हणाले, मात्र वरिष्ठांशी चर्चा करून एक ते दोन दिवसांत निर्णय कळवतो, असे शिंदे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख रमेश काळे म्हणाले.
यामुळे शिंदे गट शिवसेनेचे वरिष्ठ काय निर्णय घेतात, याकडे पोलिस प्रशासनासह संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. आता नेमकं काय निर्णय होणार, असे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news