

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठीतील लेखन असो वा हिंदीतील कवितांचे लेखन… उर्दू भाषेतील शब्दांचे महत्त्व असो वा संस्कृतमधील काव्यरचना… अशा विविध भाषांचे जग सध्या आयटी क्षेत्रातील नोकरदार तरुणाईला खुणावत आहे. त्यामुळे आता आयटी क्षेत्रात काम करणारी तरुणाई विविध भाषा शिकण्यावर भर देत असून, विविध भाषांचे जग जाणून घेण्यासह त्या भाषांमधील लेखन, बोली अन् या भाषेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी तरुण-तरुणी ऑनलाइन-ऑफलाइन वर्गाद्वारे भाषिक शिक्षण घेत आहेत.
वर्क फ—ॅाम होममधून मिळणार्या फावल्या वेळेत तरुण-तरुणी विविध भाषांचे शिक्षण घेत आहेत आणि मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू अन् गुजराती भाषा शिकण्याकडे सर्वाधिक कल आहे. तरुणांसाठी करिअरचे दुसरे पर्यायही निर्माण झाले आहेत. पुण्यातील आयटीत क्षेत्रात काम करणारी नोकरदार तरुणाई वर्क फ—ॉम होममध्ये व्यग्र आहे. कामासोबतच आपली आवड जपण्याचा प्रयत्न तरुण-तरुणी करीत आहेत. त्यामुळेच आता आयटीतील नोकरदार तरुणाईचा ओढा भाषा शिकण्याकडे वाढला आहे. यासाठी ऑनलाइन-ऑफलाइन वर्गामध्ये ही तरुणाई भाषिक ज्ञानाचे धडे गिरवत असून, विविध भाषा बोलण्याचा लहेजा, त्यातील शब्दांचे ज्ञान, व्याकरण, ती भाषा बोलण्याची पद्धत आणि त्यातील लेखन कसे करावे, याबाबतचे ज्ञान तरुणाई घेत आहे. वेगळे काहीतरी शिकत असल्यामुळे त्यांच्यात एक नवा आत्मविश्वास आणि ऊर्जा निर्माण झाली आहे. काहींनी ब्लॉग लिहिण्यासही सुरुवात केली आहे, तर काही जण 'व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट' म्हणूनही काम करीत आहेत.
हिंदी, उर्दू आणि मराठी भाषेचे प्रशिक्षण देणार्या मंजिरी धामणकर म्हणाल्या, 'आयटीतील नोकरदार तरुणांना मी हिंदी, मराठी आणि उर्दू भाषा शिकवत आहे. ऑनलाइन वर्गातही भाषिक शिक्षणासाठी येणार्या तरुणांची संख्याही मोठी आहे.
आयटीतील नोकरदार चरणराज लोखंडे म्हणाला, 'सध्या वर्क फ—ॉम होम सुरू आहे. पण, शनिवारी आणि रविवारी मिळणार्या सुटीत हिंदी अन् उर्दू भाषा शिकत आहेत. या दोन्ही भाषा बोलण्याचा लहेजा, त्यातील शब्दांचे ज्ञान, व्याकरण आणि त्यातील लेखन कसे करावे, याबाबतचे ज्ञान मी घेत असून, त्याचा मला खूप उपयोग होत आहे.'