दोन धार्मिक स्थळांना जोडणारा शिर्डी-पुणतांबा रस्ता कामास सुरुवात

दोन धार्मिक स्थळांना जोडणारा शिर्डी-पुणतांबा रस्ता कामास सुरुवात

पुणतांबा(ता. राहता); पुढारी वृत्तसेवा : दोन धार्मिक स्थळांना जोडणारा शिर्डी – पुणतांबा रस्ता डांबरीकरण कामाला सुरूवात झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्याला जाण्यासह दळणवळण व भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्याची पाच वर्षांपासून दुरुस्ती झाली नसल्याने दयनीय अवस्था झाली होती. यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांची सरपंच डॉ. धनंजय धनवटे, उपसरपंच संदीप धनवटे, महेश चव्हाण, गणेश कारखाना संचालक राजेंद्र थोरात, बाळासाहेब भोरकडे यांनी भेट घेऊन शिर्डी-पुणतांबा रस्ता दुरुस्तीस निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली होती.

ना. विखे यांच्या प्रयत्नातून या 15 कि. मी. रस्त्यासाठी सुमारे 5 कोटी रुपये निधी मंजूर झाला. प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली आहे. दोन तीर्थक्षेत्रांना जोडणार्‍या या रस्ता कामामुळे पुणतांब्याच्या विकासास चालना मिळणार आहे. गावाला जोडणारे पुणतांबा- कोपरगाव तसेच वाकडी, न. पा. वाडी, रामपूरवाडी, जळगाव या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

शिर्डी येथे मनमाड मार्गे येणार्‍या रेल्वे गाड्यांचा पुणतांबेतील थांबा बंद केल्याने प्रवाशांना मोठी अडचण निर्माण होते. पुणतांबा स्थानकाला जंक्शनचा दर्जा मिळाला आहे, मात्र दौंड-मनमाड मार्गावरून धावणारे जलद गाड्यांना येथे अद्यापि थांबा मिळाला नसला तरी शिर्डीस येणार्‍या गाड्यांना येथे थांबा मिळावा, यासाठी ना. विखे व खा. डॉ. सुजय विखे यांची शिष्टमंडळ भेट घेणार आहे.

                                                               – डॉ. धनंजय धनवटे, सरपंच, पुणतांबा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news