

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात रानडुकरांनी उच्छाद मांडला असून, सर्वच पिकांची नासाडी करण्यात येत असल्याने शेतकर्यांमध्ये संतापाची लाट आहे. नगर तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीने आर्थिक अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील मूग, बाजरी, सोयाबीन व अन्य पिकांची वाताहात झाली. तर, रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा व चारा पिकांसाठी मोठा खर्च करण्यात आला आहे. कांद्याचे रोप, शेतीची मशागत, पेरणी, कांदा लागवडीसाठी शेतकर्यांनी खर्च केला आहे. अचानक वातावरणात झालेल्या बदलाने सर्वच पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो.
धुके, ढगाळ वातावरण अन् दवामुळे कांदा, गहू, हरभरा या रब्बी हंगामातील मुख्य पिकांबरोबर इतर पिकांवर डाऊनी, मावा, मर, सड, फुलकिडे, अळींचा प्रादुर्भाव, करपा, तांबेरा अशा विविध रोगांबरोबर बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचाही प्रादुर्भाव आढळून येतो. महागड्या औषधांची फवारणी करून पिके जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. तरी, देखील रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात घट होणार निश्चित माले जात आहे.
रोगांच्या प्रादुर्भावावर मात करण्याच्या प्रयत्नात असणार्या तालुक्यातील शेतकर्यांसमोर नव्याने रानडुकरांचा उच्छाद सुरू असून, मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी करण्यात येत आहे. तालुक्यात सर्वत्र रानडुकरांकडून पिकांची नासाडी सुरू आहे. त्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदिल झाला. चिचोंडी पाटील, वाळकी, जेऊर, चास, देहरे, अकोळनेर, मेहकरी परिसरात रानडुकरांची संख्या जास्त आहे. गर्भगिरीच्या डोंगर रांगा तालुक्यात मोठ्या प्रमाणात विखुरलेल्या असून, त्यामध्ये पोषक वातावरणामुळे रानडुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रानडुकरांची वाढती संख्या शेतकर्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
फळबागांसह इतर साहित्याचे नुकसान
रानडुकरांकडून पिकांबरोबर ठिबक सिंचन, तुषार सिंचनच्या पाईपचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येत आहे. तसेच, फळबागांचेही नुकसान करण्यात येते. तरी रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी तालुक्यातील शेतकर्यांकडून होत आहे.
सर्वेक्षणात संख्या वाढल्याचे स्पष्ट
वनविभागातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातही तालुक्यात रानडूक्कर व चिंकारांची संख्या वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे. जेऊर परिसरात रानडुकरांनी शेतकर्यांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. जेऊरच्या ग्रामसभेत रानडुकरांचा बंदोबस्त करण्याबाबतचा ठराव घेण्यात आल्याने परिसरातील रानडुकराांच्या उपद्रवाची कल्पना येते.
रानडूकरे मोठ्या कळपाने फिरतात. उभ्या पिकात कळत घुसल्याने सर्व पिकांचे नुकसान होते. रानडूकरांच्या वाढत्या संख्येमुळे मानववस्ती जवळही त्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
– सोपान आव्हाड, शेतकरी, पांगरमलरानडुकरांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून,
मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी होत आहे. रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत आहे. त्यातच रानडुकरांकडून होणार्या उपद्रवामुळे शेतकरी संतापला आहे. नुकसान टाळण्यासाठी पिकाला वाघुर्याचे कंपाउंड केले, तरीही रानडुकरांचा उपद्रव थांबत नाही.
-सुरज तोडमल, शेतकरी, जेऊरलोखंडी पाईपवर पोते टाकून त्यावर डिझेल व मिरचीची पूड टाकावी. पोते तारेने पॅक करून मशाली सारखा जाळ करावा. तसेच, केस जाळल्यानेही रानडूकरांचा उपद्रव कमी होतो. असे प्रयोग बर्याच ठिकाणी यशस्वी झाल्याचे दिसून येतात. शेतकर्यांनी असे प्रयोग करायला हवे.
– मनेष जाधव, वनपाल, वनविभाग