कुकाणा पाटबंधारे उपविभाग वार्‍यावर..! उपअभियंत्यांसह पाचही शाखांच्या शाखाधिकर्‍यांनी पदे रिक्त

कुकाणा पाटबंधारे उपविभाग वार्‍यावर..! उपअभियंत्यांसह पाचही शाखांच्या शाखाधिकर्‍यांनी पदे रिक्त

कैलास शिंदे : 

नेवासा : मुळा पाटबंधारे कुकाणा पाटबंधारे उपविभाग सध्या वार्‍यावरच असल्याचे दिसून येत आहे. कुकाणा उपविभागातंर्गत उपअभियंत्यांसह पाचही शाखांच्या शाखाधिकर्‍यांनी पदे रिक्त असून, पुढील महिन्यात रब्बीचे पाटपाणी आवर्तन नेमके कोणाच्या भरवशावर सोडणार, याची चिंता पाटपाणी लाभार्थी शेतकर्‍यांना लागली आहे. कुकाणा उपविभातंर्गत जवळपास पंधरा हजारांहून अधिक हेक्टर सिंचनक्षेत्र असताना, या उपविभागातील सर्वच प्रमुख पदे रिक्त ठेवण्याचा आश्चर्यकारक प्रताप पाटबंधारे विभागाकडून करण्यात आला आहे. पाटपाणी आवर्तन सोडण्यापूर्वीच ही पदे भरण्यात यावीत, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

मुळा पाटबंधारेच्या कुकाणा उपविभागात कुकाणा सिंचन शाखा क्रमांक एक व दोन, शिरसगाव, सलाबतपूर व दहिगाव (ता. शेवगाव) अशा सिंचन शाखा आहेत. कुकाणा उपविभागाचे उपअभियंता हे मुख्य पदच रिक्त आहे. शिवाय वरील सर्व पाचही शाखांच्या शाखाधिकर्‍यांची पदेही रिक्त आहेत. नेवासा तालुक्याचा अर्धा भाग व शेवगावचा काही अधिक भाग कुकाणा उपविभागातंर्गत येतो. मुळा पाटबंधारेकडून कुकाणा उपविभागच वार्‍यावर सोडला की काय?असा प्रश्न रिक्त पदांमुळे निर्माण झाला आहे.

कुकाणा परिसरातील देवगाव, भेंडा, सोैंदाळा, शिरसगाव, वाकडी, गेवराई, सलाबतपूर, पिंप्रीशहाली, तरवडी, वडुले, पाथरवाले, चिलेखनवाडी, अंतरवाली, जेऊर हैबती, देवसडे, तेलकुडगाव या मुख्य गावांच्या शिवारासह लगतच्या शेवगाव तालुक्यातील भायगाव, दहिगाव, बक्तरपूर, मठाचीवाडी, रांजणी, शहरटाकळी, भावीनिमगाव, देवटाकळी हा शिवारही कुकाणा उपविभागाच्या सिंचन क्षेत्राखाली येतो. कुकाणा उपविभागासाठी चिलेखनवाडीत उपअभियंता कार्यालय असून कुकाण्यातही उपअभियंत्यासह सर्व शाखाधिकारी कार्यालये आहेत. अभियंता वगळता कालवा निरीक्षक व त्याखालील कर्मचारीही पाटबंधारे विभागात कुकाण्यात कार्यरत आहेत. पण, अडचण आहे ती उपअभियंता व सर्वच शाखांना शाखा अभियंते नाहीत याचीच. पाटपाणी मागणी अर्ज, चार्‍यांच्या अडचणींसाठी पाटपाणी लाभार्थी या कार्यालयाकडे चकरा मारतात. पण, रिक्त पदांमुळे ही जबाबदारी कोण घेणार, हाच सवाल आहे.

पाटबंधारे कुकाणा उपअभियंत्यांसह सर्व शाखाधिकारी पदे ही आवर्तनापूर्वीच भरण्यात यावीत, अशी मागणी कुकाण्याच्या सरपंच लताताई अभंग, वडुलेचे सरपंच दिनकर गर्जे, देवगावच्या सरपंच सुनिता गायकवाड, तरवडीचे सरपंच बाबासाहेब घुले, चिलेखनवाडीचे उपसरपंच नाथा गुंजाळ व बजरंग पुरी, तेलकुडगाव संस्थेचे अध्यक्ष अरुण घाडगे, सोैंदाळ्याचे सरपंच शरद आरगडे, अंतरवालीचे सरपंच संदीप देशमुख, देवसडेचे अशोक उगले, भेंड्याचे सरपंच सुनील खरात, देवगाव संस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ निकम आदींनी केली आहे.

पाणी येणार, पण नियोजन कोण करणार?

सद्यःस्थितीत कुकाणा उपअभियंता पदाचा पदभार घोडेगाव उपअभियंत्याच्या हाती, तर कुकाण्यातील पाच शाखांपैकी एकाच शाखेवर प्रभारी शाखाधिकारी काम बघत आहेत. उर्वरित शाखांना कोणीच वाली नाही. जानेवारीत पहिल्याच आठवड्यात रब्बीचे आवर्तन सुटणार आहे. पाटपाणी येणार, पण रिक्त पदांअभावी त्याचे नियोजन कसे करणार? हा प्रश्न पाटबंधारे कर्मचार्‍यांसह पाटपाणी लाभार्थी शेतकर्‍यांना पडला आहे.

logo
Pudhari News
pudhari.news