कर्जत : मांत्रिकाचा महिलेस 15 हजारांचा गंडा

कर्जत : मांत्रिकाचा महिलेस 15 हजारांचा गंडा

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  नवरा काहीच कामधंदा करत नाही, त्याला बाहेरचा नाद आहे, हे सगळं ठीक करण्यासाठी एका भोंदूबाबाने महिलेकडून तब्बल पंधरा हजार रूपये उकळले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भोंदूबाबावर गुन्हा दाखल केला आहे. नवनाथ साहेबराव मांडगे असे या मांत्रिकाचे नाव आहे. कर्जत तालुक्यातील एक महिला मुलगी व पतीसह पुणे येथे राहते. महिलेचा पती काही कामधंदा करत नसल्याने व त्रास देत असल्याचे फिर्यादी महिलेने शेजारी राहणार्‍या एका महिलेला सांगितले. तेव्हा तिने ओळखीच्या जळकेवाडी येथील नवनाथ मांडगे या मांत्रिकाला तिच्या घरी बोलावले.

नवर्‍याला ठीक करण्यासाठी सदर महिला व तिच्या मुलीसमोर पाटावर गहू ठेवून, अगरबत्ती लावून, स्वतःजवळची पांढरी पावडर ओवाळून, ती पावडर पंधरा दिवस भाजीत टाकून नवर्‍याला खायला देण्याचा व ताईत गळ्यात बांधण्याचा सल्ला या भोंदूबाबाने दिला. त्यासाठी महिलेकडून पंधरा हजार उकळले. मात्र, पंधरा दिवसांनंतरही नवरा आणि त्याची सवय 'जैसे थे'च राहिल्याने अखेर महिलेने पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडे धाव घेतली.

त्यांना सर्व हकीकत सांगितल्यानंतर गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पांडुरंग भांडवलकर, राजेश थोरात हे करत आहेत.

कोणताही आजार-मन:स्थिती, जादूटोणा, अंगारे-धुपारे अशा उपचाराने बरा होत नाही. भोंदूबाबाच्या, मांत्रिकाच्या थापांना बळी पडू नये. असा प्रकार कुठे घडत असल्यास पोलिसांत संपर्क साधावा.
                                            – चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, कर्जत

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news