नगर : जमीन मोजणीस आलेल्या अधिकार्‍यांना पिटाळले..!

नगर : जमीन मोजणीस आलेल्या अधिकार्‍यांना पिटाळले..!

राहुरी (नगर) : पुढारी वृत्तसेवा : सुरत ते हैदराबाद या प्रस्तावित राष्ट्रीय मार्गाबाबत संपादित क्षेत्राची मोजणी करण्यास आलेल्या अधिकार्‍यांना शेतकर्‍यांचा संताप सहन करावा लागला. संतप्त शेतकर्‍यांनी शासनानकडे मागणी करीत मोबदला लेखी स्वरूपात जाहीर करावा, अन्यथा जीव गेला तरी चालेल, परंतु आमच्या हक्काचे क्षेत्र सोडणार नाही, अशी ठोस भूमिका घेतली. दरम्यान, याबाबत प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदने देण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वप्न असलेल्या सुरत ते हैदराबाद या ग्रिन फिल्ड महामार्गासाठी क्षेत्र संपादन प्रक्रिया सुरू आहे.

शेतकर्‍यांनी या महामार्गाला तीव्र विरोध करूनही राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प विभागाकडून संपादन प्रक्रिया सुरू आहे. राहुरी खुर्द येथे संबंधित प्रकल्पाचे अधिकारी क्षेत्र मोजणीसाठी दाखल झाले होते. याबाबतची माहिती शेतकर्‍यांना होताच अनेक शेतकर्‍यांचा ताफा राहुरी खुर्द येथे दाखल झाला. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या अधिकार्‍यांना क्षेत्र मोजणी करून देणार नसल्याचा निर्वाळा यावेळी शेतकर्‍यांनी दिला.

याप्रसंगी उपस्थित असलेल्या नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला असता, शेतकर्‍यांनी सांगितले की, शासन शेतकर्‍यांवर दडपशाही करीत आहे. राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांनी शासकीय प्रकल्पाला आपल्या जमिनी देऊन अनेक वर्षे उलटली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मुळा धरण, महावितरण पोल फॅक्टरी, महावितरणचे नविन सबस्टेशन आदी प्रकल्पांना जमिनी दिल्या. संबंधित शेतकरी आजही प्रकल्पबाधिताचे दाखले हातात घेऊन मोबदला मागत आहेत. शासनाने प्रकल्प व धरण ग्रस्तांना न्याय दिला नाही. तीच वेळ ग्रिन फिल्ड संपादित शेतकर्‍यांवर येण्याची शक्यता आहे.

केंद्र शासनाच्या स्वप्नपूर्ती प्रकल्पासाठी राज्य शासनाने कोणताही मोबदला जाहीर न करता सुरू केलेले संपादन म्हणजे दडपशाही आहे. शेतकर्‍यांवर दडपशाही करून जमिनी हस्तांतरण करण्याची प्रक्रिया होत असल्यास आम्ही ते सहन करणार नाही. महसूल व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांसमवेत बसून चर्चा करावी, असे शेतकरी म्हणाले. दरम्यान, शेतकर्‍यांचा संताप पाहता ग्रिन फिल्डसाठी कार्यरत असलेल्या शासकीय अधिकार्‍यांना मोजणी न करताच परतावे लागले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, गंगाधर सांगळे, बाबासाहेब धोंडे, अशोक तोडमल, अनिल वराळे, उत्तम वराळे, जमीन आत्तार, भारत शेंडगे, तुषार काळे, दिगंबर शेंडगे आदींसह शेतकरी, कृषी अधिकारी व महसूल अधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news