

पारनेर/जवळा : पुढारी वृत्तसेवा : पारनेर सहकारी साखर कारखान्याचा लवकरच सभासद, शेतकरी व कामगार ताबा घेणार असल्याची घोषणा देवीभोयरे येथील शेतकरी कामगार महासंघाच्या बैठकीत करण्यात आली. राज्य सहकारी बँकेतील घोटाळा उघड करणारे शेतकरी – कामगार नेते माणिकराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थित ही बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्य सहकारी बँकेने किरकोळ कर्जासाठी पारनेर साखर कारखान्याची बेकायदेशीर विक्री केली असल्याचा आरोप करण्यात आला. पारनेर कारखान्याची विक्री नसून तो क्रांती शुगरचा अतिक्रमण व कब्जा असल्याचा घनाघाती आरोप जाधव यांनी केला. हा ताबा अतिक्रमण काढल्यासारखा उलथून टाका, असे आवाहन त्यांनी पारनेरकरांना केले.
हा ताबा मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी कामगार संघटनेची ताकद देवू असेही ते म्हणाले. राज्य सहकारी बँकेच्या चौकशी अहवालात पारनेरला बेकायदेशीर विकल्याचा ठपका देखील ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पारनेर प्रमाणे राज्यातील इतर 49 सहकारी कारखाने या बँकेने विकले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशानंतर या बँकेच्ता संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे. सुप्रीम कोर्टानेही या गुन्ह्याला स्थगिती नाकारली आहे. आता, या गुन्ह्याचा तपास सध्याचे राज्य सरकार करू इच्छित आहे. परंतु, आधीचा तपास मागे घेत असल्याचे सरकारचे न्यायालयात म्हणणे याचिकाकर्ते यांना मान्य नाही. आधी तो तपास चुकीचा असल्याने रद्द करा, मगच नव्याने तपास करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाऊसाहेब खेडेकर, पांडुरंग पडवळ, रामदास कवडे, कृष्णाजी बडवे, जालींदर सालके, ओंकार सालके, संकेत शेळके, अमोल ठुबे, भाऊ पानमंद, पोपट लंके, शिवाजी क्षीरसागर, संपतराव वाळुंज, सुभाष बेलोटे, विठ्ठल कवाद, शंकर गुंड, रघुनाथ मांडगे, संभाजीराव सालके, बबनराव सालके, गोविंद बडवे, ज्ञानदेव पठारे, दत्ता भूकन, बाबाजी गाडीलकर, श्रीधर गाडीलकर, शंकर तांबे, एकनाथ गुंजाळ भानुदास साळवे, दिगंबर घोगरे, दत्ता पवार, शिवाजी पवार, बाबुराव मुळे यांच्यासह अनेक शेतकरी कामगार उपस्थित होते.