राहुरी : पुढारी वृत्तसेवा : 'तुला इंग्लिश बोलता येत नाही, तू जाड आहेस, असे म्हणत गाडी व फ्लॅटचे हप्ते भरण्यास माहेरहून 30 लाख रुपये आणावे, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी सासरच्या सहा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भाग्यश्री अक्षय कसोटे( वय 30 वर्षे, रा. हडपसर, पुणे) या विवाहितेने राहुरी पोलिसत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लग्नानंतर दुसर्या दिवसापासून (दि. 28 ऑक्टोबर 2022) पर्यंत सदाशिव नगर, हडपसर येथे सासरी भाग्यश्री कसोटे नांदत असताना, सासरच्या लोकांनी, 'तुझ्या वडिलांनी लग्नात चांगले जेवण दिले नाही.
तुला इंग्लिश बोलता येत नाही. तू जाड आहे. तुला घरात स्वच्छता ठेवता येत नाही,' असे म्हणत भाग्यश्री कसोटे आजारी असताना त्यांना उपाशी ठेवले. 'गाडी व फ्लॅटचे हप्ते भरण्यास 30 लाख रुपये तुझ्या आई-वडिलांकडून घेऊन ये,' अशी मागणी करून शारीरिक व मानसिक छळ केला. भाग्यश्री कसोटे व वडिलांना लाथा- बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. भाग्यश्री कसोटे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात पती अक्षय जयवंत कसोटे, सासरा जयवंत विनोद कसोटे, सासू संगिता जयवंत कसोटे, दीर आकाश जयवंत कसोटे (सर्व रा. हडपसर, पुणे) व अनिल साळवे, विजया अनिल साळवे (दोघे रा. दापोली, ता. जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.