गणोरे : पुढारी वृत्तसेवा
गणोरे येथील गट नंबर पाच मध्ये ग्रामपंचायत मालकीची उजाड उंच सखल जमिनीत सुधारणा करून तेथे भव्य क्रीडांगण, वृक्षारोपण व रोपवाटीका तयार करून गणोरेचा उडान परिसर पर्यटनस्थळ बनवून गणोरे गावाची ओळख राज्यपातळीवर घेऊन जाण्याचा गणोरे ग्रामपंचायत प्रशासनाचा मानस आहे.
ग्रामपंचायतीच्या मालकीच्या वीस एकर जमिनीत सुधारणा करून तेथे दोन एकर क्षेत्रात मुलांना खेळण्यासाठी भव्य क्रीडागंण होत आहे. ग्रामपंचायतीने रोपवाटीका तयार केली आहे. या रोपवाटीकेमध्ये बांबू, कडुनिंब, कौठ अशा प्रकारचे रोपे आहेत. माझी वसुधंरा अभियान गणोरे गावात राबविण्यात येत आहे. यामध्ये ग्रामस्थांचा सहभाग प्रेरणादायी आहे. तपासणीसाठी समिती देखील लवकरच गावात येत आहे.
मनुष्य आपली तहान भागवण्यासाठी कोठूनही पाणी उपलब्ध करू शकतो. परंतु, पशुपक्षी यांच्यासाठी पाणी व चार्याची सोय व्हावी. या दृष्टीने सावली असलेल्या झाडांना पक्षासाठी धान्य व पाण्याची भांडे अडकवले आहे. गणोरे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या परिसरास एक वेळ भेट द्यावी, असे आवाहन गणोरे ग्रामपंचायत प्रशासनाने दिले. याभागात आणखी सुधारणा करण्यासाठी ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा, असे सरपंच संतोष आंबरे, उपसरपंच प्रदीप भालेराव, एकनाथ ढाकणे यांनी आवाहन केले आहे.