गॅस पाईपलाईन प्रकरण चिघळणार ! औरंगाबाद महामार्गावर जेऊरमधील परिस्थिती

गॅस पाईपलाईन प्रकरण चिघळणार ! औरंगाबाद महामार्गावर जेऊरमधील परिस्थिती

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर-औरंगाबाद महामार्गालगत सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनबाबत अनेक शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या, वाद घातले, नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी केली. परंतु, प्रशासनाच्या गळचेप्या भूमिकेमुळे शेतकर्‍यांना न्याय मिळालाच नाही. त्यामुळे नुकसान झालेल्या एका शेतकरी दाम्पत्याने आता आत्मदहनाचा इशारा दिला असल्याने, गॅस पाईपलाईन प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. इमामपूर येथील शेतकरी बन्सी वाघमारे यांची महामार्गालगत शेती आहे. गॅस पाईपलाईनचे काम सुरू असताना पाणी वाहून जाण्यासाठी असणारे छोटे पूल बंद करण्यात आले.

तसेच, उकरण्यात आलेल्या मातीचा ढिगारा टाकण्यात आला. झालेल्या पावसाने पाणी जाण्यास जागा नसल्याने सर्व माती वाहून विहिरीत गेल्यामुळे विहीर बुजली, बोअरवेल बुजला. तसेच, पाण्याचा लोंढा शेतातून वाहिल्याने शेतातील पिके व कांद्याचे रोप वाहून गेले. घराची भिंत पडून तेथील संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. याबाबत तहसीलदारांंना निवेदन देऊनही दखल घेण्यात आली नाही.
गॅस पाईपलाईनचे काम सुरू झाल्यापासून जेऊर परिसरातील शेतकर्‍यांचे, तसेच व्यावसायिकांचे ठेकेदारने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने संतापाची लाट उसळली आहे.

शेतीचे, विहिरीचे, संसारोपयोगी वस्तूंच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी बन्सी वाघमारे व लक्ष्मीबाई वाघमारे या दाम्पत्याने दिला आहे. संबंधित ठेकेदाराकडून काम सुरू असताना, एकेरी वाहतूक व रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करून काम केले जात आहे. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली असून, अपघातात अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. संबंधित ठेकेदाराला परवानगी देणार्‍या सर्व खात्यांच्या अधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी. तसेच, झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना मोबदला देण्यात यावा. अन्यथा शेवटच्या टप्प्यात राहिलेले काम करू देणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

अन्यथा शेतकर्‍यांचा जनआक्रोश
गॅस पाईपलाईनच्या कामामुळे शेतकरी, व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूल बंद केल्याने शेतीतील पिके व माती वाहून गेली. प्रशासनाचे अधिकारी याबाबत गप्प का? शेतकर्‍यांच्या पाठीशी कोणीही पुढारी उभा राहिला नाही. नुकसानीची पाहणी करून तात्काळ मोबदला न मिळाल्यास शेतकर्‍यांचा जनआक्रोश होईल, असे नीलेश गोरे यांनी सांगितले.

अधिकार्‍यांकडून ठेकेदाराला अभय
गॅस पाईपलाईनच्या कामामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरातील संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. विहीर, बोअरवेल बुजला गेला. तहसीलदारांना निवेदन दिले. परंतु, सर्वच खात्याचे अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत.
आम्हाला मोबदला न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचे शेतकरी बन्सी वाघमारे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news