

नगर; पुढारी वृत्तसेवा : प्राथमिक शिक्षकांच्या पगारपत्रकासाठी वापरण्यात येणारी शालार्थ वेतन प्रणालीचे आयडी, पासवर्ड मुख्याध्यापकांकडून दुसर्या व्यक्तीकडे गेल्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्यांनी गट शिक्षणाधिकार्यांकडून खुलासा मागविला आहे. तीन दिवसांत हा खुलासा सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी काढले आहेत. 'शिक्षकांच्या पगारसाठी हातोहात यंत्रणा' या मथळ्याखाली पुढारीने शनिवारी (दि.7) वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत हा खुलासा मागविण्यात आला आहे.
शिक्षकांचे पगारपत्रक तयार करण्यासाठी शालार्थ वेतन प्रणाली वापरली जाते. त्यासाठी मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचा आयडी, पासवर्ड मुख्याध्याकांना देण्यात आला आहेे. पगारपत्रक तयार करून ती प्रणालीत भरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असताना त्रयस्थ व्यक्तीकडे आयडी, पासवर्ड गेल्याकडे पुढारीने लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी खुलासा मागविला आहे. शिक्षकांच्या पगाराचे देयके तयार करण्याची जबाबदारी ही त्या-त्या मुख्याध्यापकांची आहे.
मुख्याध्यापकांनी प्रणालीत भरलेली माहिती प्रमाणित करण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकार्यांची आहे. शिक्षणाधिकारी हे पर्यवेक्षक सनियंत्रक आहेत. भविष्यात पगारासंदर्भात काही प्रश्न उपस्थित झाल्यास मुख्याध्यापकांची सर्वस्वी जबाबदारी असल्याचे आदेश डिसेंबर 2021 मध्ये जिल्हा परिषदेने दिलेले आहेत. असे असतानाही मुख्याध्यापकांकडे असलेला आयडी, पासवर्ड हा त्रयस्थाकडे असून तेच प्रणालीत माहिती भरतात, यावर पुढारीने प्रकाशझोत टाकला होता. त्याची दखल घेत शिक्षणधिकारी भास्कर पाटील यांनी सर्व तालुका गट शिक्षणाधिकार्यांकडून वस्तूस्थितीदर्शक अहवाल मागविला आहे.