‘त्या’ मुलांचा मृत्यू शेततळ्यात बुडून नव्हे, घातपात?

‘त्या’ मुलांचा मृत्यू शेततळ्यात बुडून नव्हे, घातपात?

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला, हा प्रकार अकस्मात मृत्यूचा नसून मुलांचा घातपात झाल्याचा संशय तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत नाशिक- पुणे महामार्गावर हिवरगाव टोल नाका येथे बुधवारी (29) रोजी सकाळी आक्रमक ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करीत ठिय्या मांडला. यावेळी आंदोलकांकडून प्रशासनाला मागणीचे निवेदन देण्यात आले.

हिवरगाव पावसा येथे गेल्या महिन्यात (दि. 17 एप्रिल) रोजी दुपारी 4 वाजता शेततळ्यात बुडून रितेश सारंग पावसे व प्रणव सारंग पावसे या दोन मुलांचा मृत्यू झाला, मात्र हे मृत्यू अकस्मात नसून, पूर्णतः घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप संतप्त आंदोलकांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून, दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, यासाठी अनेकदा तालुक्याचे पो. नि. देविदास ढुमणे व उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाक्चौरे यांना भेटलो, मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासन मिळाले. अद्याप कार्यवाही झाली नाही. या पार्श्वभूमीवर हिवरगाव ग्रामस्थांची बैठक झाली.

ग्रामस्थांनी एकमुखाने हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला. याप्रकरणी प्रशासन आरोपींना पाठीशी घालीत असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे येत्या 28 मेपर्यंत संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती, परंतु पोलिस प्रशासनाला तपास करण्यात अपयश आल्यामुळे 29 रोजी हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी थेट पुणे- नाशिक महामार्गावर टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले.

संबंधितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी आंदोलक गावकर्‍यांनी केली. विशेष असे की, पोलिसांच्या वेळकाढू धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आंदोलन सुरु असताना टोल नाक्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांच्या तब्बल 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, प्रमोद पावसे, विजय पावसे, गणेश दवंगे, सुरेश गडाख, अशोक पावसे, सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, डॉ. प्रमोद पावसे, किरण पावसे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

पोलिस अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद!

दोन मुलांच्या मृत्यूप्रकरणी पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाक्चौरे व पो. नि. देविदास ढुमणे यांची भूमिका संशयास्पद आहे, अशी नाराजी व्यक्त करीत ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी हे दोन्ही अधिकारी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. या आंदोलनाची दखल न घेतल्यास येत्या 6 जून रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news