‘त्या’ कंत्राटी अभियंत्यांच्या पुनर्नियुक्तीचा घाट

‘त्या’ कंत्राटी अभियंत्यांच्या पुनर्नियुक्तीचा घाट

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कोट्यवधींचे ठेके मिळण्यासाठी नात्यातीलच कंत्राटी अभियंते पुनर्नियुक्तीसाठी 'खास'ठेकेदाराने पुढाकार घेतला असून तशी फिल्डींग लावली आहे. मुदत संपल्यानंतर पुन्हा ठेकेदाराच्या नातलाग 'त्या' कंत्राटी अभियंत्यांना पुनर्नियुक्ती मिळणार की प्रशासन दबाव धुडकून लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विद्यापीठ प्रमुखांचा 'खास ठेकेदार' ओळख बनल्याने अख्खे विद्यापीठ त्याच्या दबावात काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नातलगाच्या भल्यासाठी फिल्डिंग

विद्यापीठातील कोट्यवधींचे ठेके मिळावे यासाठी 'खास ठेकेदाराने' त्याचे नातलग कंत्राटी अभियंते भरती करून घेतले. त्यांच्या माध्यमातून तो ठेके मिळू लागला. मात्र आता त्या कंत्राटी अभियंत्यांची मुदत संपली आहे. तरीही ते विद्यापीठात कार्यरत आहेत, त्यांना पुनर्नियुक्ती मिळणारच, या आवेशात ठेकेदार आणि त्यांचे नातलग अभियंते वावरत आहेत.

कृषी विद्यापीठातील बांधकाम विभागाचे सेवाप्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण नसतानाही पदोन्नती, एकाच ठेकेदारावर मेहेरबानी, टेंडर मंजुरी अन् लगेचच बिले अदा करणे यासह अनेक कारनामे पुढे येत असतानाच आता हा दुसरा प्रकारही चर्चेत आला आहे. याबाबतच्या तक्रारी मुख्यमंत्री व राज्यपालांकडे पोहचल्या आहेत. अशातच राहुरीत बसून विद्यापीठाचे सूत्रे हलविणारा ठेकेदार त्यांच्या नातलगांना कंत्राटी अभियंते म्हणून पुनर्नियुक्तीसाठी दबाव टाकत आहे. काही संबंध नसणार्‍या या ठेकेदारापुढे विद्यापीठातील बड्या अधिकार्‍यांनीही मान झुकविली आहे (अर्थात त्याला 'नाजूक'तेची किनार असल्याची चर्चा आहे).

'यापुढे नाही' म्हणत पुन्हा तेच

एका महिला कंत्राटी अभियंत्यांच्या मिस्टरांनाच विद्यापीठाचा कोट्यवधींचा ठेका मिळाला होता. त्यावर आ. प्राजक्त तनपुरे यांनी कानउघडणी करताच विद्यापीठाने नरमाईची भूमिका घेत 'यापुढे नाही' अशी भूमिका मांडली होती. त्यानंतरही 'खास ठेकेदारा'च्या चार नातलगांना कंत्राटी अभियंत्या पदावर संधी देण्यात आली. हे अभियंते 'विद्यापीठात कमी अन् 'त्या खास'च्या ठेप्यावर जादा' अशी परिस्थिती अनेकांनी पाहिली, अनुभवली. 'त्या खास'च्या कार्यालयात सगळ्याच टेंडरची कागदं काळी होत असल्याची चर्चा सर्वत्र झडली. आता त्या कंत्राटीची मुदत संपली आहे. ते बाहेर पडले तर प्र'भाव' ओसरेल या भीतीपोटी त्यांच्या पुनर्नियुक्तीचा घाट घातला जात आहे.

कुलगुरूंनीच आता भूमिका घ्यावी

विशेष म्हणजे 'त्या खास' ठेकेदाराची सगळे कारभार विद्यापीठातील वरिष्ठांना ठाऊक नाही, असे म्हणणे अतिशोक्ती ठरेल. तरीही वरिष्ठ काहीच भूमिका घेत नसल्याने त्यांच्याभोवतीच संशयाचे वलय निर्माण होवू पाहत आहे. कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील हे कडक व शिस्तीप्रिय असल्याचा दावा केला जात असतानाही ते 'खास ठेकेदारा'संदर्भातील कोणत्याच कारभारात हात घालत नसल्याची चर्चा आहे. स्वत:ची शिस्तप्रियता दाखवयाची असेल तर कुलगुरूंनाच आता भूमिका घ्यावी लागणार आहे.

विरोधी पक्षनेत्यांना पुरावे देणार

विद्यापीठातील अनागोंदी कारभाराची तक्रार राज्यपालांकडे करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून कारवाई न झाल्यास राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांकडे अनियमतीतेचे पुरावे सादर करून कारवाईस भाग पाडू यासाठी ठेका डावलेले ठेकेदार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेस्ट हाऊसमध्ये राहून घरभाडे

विद्यापीठाच्याच विश्रामगृहात (गेस्ट हाऊस) राहत होते. त्यासाठी सुमारे दीड हजार रुपये भाडेही ते भरत होते. मात्र असे असतानाही त्यांनी शासनाकडून हेच अधिकारी वेतनात मात्र घरभाडे भत्ता घेत होते. शासनाची ही फसवणूक विद्यापीठातील वरिष्ठांच्या समन्वयातून की कशी? याबाबतची तक्रार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी अ‍ॅड योगेश सजगुरे, अ‍ॅड. गणेश येवले यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

मुदत संपली तरी काढतात बिले

'खास'च्या नात्यातील कंत्राटी अभियंत्यांचा कार्यकाळ संपला आहे. तरीही ते विद्यापीठाच्या कामकाजात सहभागी होत विद्यापीठातील ठेक्यांची बिले काढत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यांच्याशिवाय नवीन ठेकाही दिला जात नाही. विशेष म्हणजे कंत्राटी भरती झालेल्या या अभियंत्यांकडे शैक्षणिक अर्हताही नसल्याचा दावा केला जात आहे. या गंभीर प्रकरणात राजकीय नेते लक्ष घालणार का?, कुलगुरू भूमिका जाहीर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news