

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिक्षकदिनी (5 सप्टेंबर) दिल्या जाणार्या जिल्हा शिक्षक पुरस्कारांसाठीची या वर्षीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी 40 गुरुजींची लेखी परीक्षा घेतली. त्यानंतर त्रिसदस्यीय समितीने मूल्यांकनाचा गोपनीय अहवालही तयार केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे हा अहवाल सादर केला जाणार असून, त्यानंतर या पुरस्कारांची घोषणा होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
जिल्ह्यातील 14 तालुक्यांतून प्रत्येकी एका शिक्षकाला जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. याशिवाय जिल्ह्यातील दोन केंद्रप्रमुखांनाही हा पुरस्कार दिला जातो. दर वर्षी शिक्षकदिनी पाच सप्टेंबरला हा कार्यक्रम घेतला जातो. या वर्षीही शिक्षण विभागाकडून कार्यक्रमाची तयारी सुरू झाल्याचे दिसत आहे. त्या अनुषंगानेच जिल्हा शिक्षक पुरस्कार निवडीसाठी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी 42 गुरुजींची मूल्यांकन आधारित परीक्षा घेतली. दोन शिक्षक गैरहजर होते. या परीक्षेचा निकाल राखून ठेवलेला आहे.
थेट शाळांवर जाऊन त्यांचे मूल्यांकन
संबंधित 42 शिक्षकांच्या थेट शाळांवर जाऊन त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांची त्रिसदस्यीय समिती तयार केली. या समितीने त्या शिक्षकांच्या वर्गातील मुलांची परीक्षा घेतली. तसेच संबंधित शिक्षकांची शिकवणी, इतर उपक्रमांतील सहभाग अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा विचार करून त्यांच्या कामांचे मूल्यांकन केले आहे. यासाठी 100 गुणांची प्रश्नावली तयार करण्यात आली होती. त्यानुसारचा हा संपूर्ण अहवाल तयार झाला असून तो लिफाफ्यात बंद आहे. सीईओ येरेकर यांच्याकडे हा अहवाल सादर करण्यात येणार असून, लेखी परीक्षा आणि समितीचे मूल्यांकन विचारात घेऊन 40 पैकी 14 शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. 40 शिक्षकांची परीक्षा घेतली. आपण नेमलेल्या समितीने मूल्यांकन अहवालही सादर केला आहे. लवकरच सीईओंसमोर हा अहवाल ठेवला जाईल. त्यानंतर पुरस्कारार्थींची निवड होईल.
– भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक