

नगर : पुढारी वृत्तसेवा : लष्कर हद्दीच्या बनावट एनओसीप्रकरणी मनपाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. नगर रचनाकार राम चारठाणकर यांनी संबंधित सर्व कागदपत्रे चौकशी अधिकारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. डॉ. पठारे त्यांची शहानिशा करून आयुक्तांना अहवाल देणार आहेत.
सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी लष्कर हद्दीच्या बनावट एनओसीप्रकरणी आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्यानंतर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी त्या प्रकरणाची चौकशी सुरू केली. चौकशी अधिकरी म्हणून अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्या ि नयुक्ती केली. त्यानुसार नगर रचनाकार राम चारठाणकर यांनी गुरूवारी संबंधित हॉस्पिटल व अन्य इमारतीच्या बांधकाम परवान्याची सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. त्या कागदपत्रांची तपासणी करून आयुक्तांना अहवाल सादर केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजली.