nagar mnc
nagar mnc

नगर :  दहा कोटींच्या निधीचा महासभेत फैसला

Published on

नगर :  पुढारी वृत्तसेवा :  शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील रस्त्यांसाठी दहा कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, कोविड काळात रस्त्याची कामे प्रलंबित राहिली. त्यानंतर स्टील व सिमेंटच्या किमती वाढल्याने ठेकेदाराने वाढीव निधी देण्याची मागणी केली. परंतु, कार्यान्वयन यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग असल्याने वाढीव निधी कोणी द्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून रस्त्यांची कामे प्रलंबित राहिली. त्यावर शनिवारी (दि. 26) होणार्‍या महासभेत निर्णय होणार आहे. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत शहरात विकासकामांसाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. शासनाच्या निर्णयानुसार प्रकल्पाअंतर्गतच्या कामासाठी कार्यान्वयन यंत्रणा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाची नियुक्ती करण्यात आली.

या योजनेंतर्गत कामासाठी 9.47 कोटीचे अनुदान शासनाकडून वर्ग करण्यात आले. या प्रकल्पाअंतर्गत 47 कामांची ई-निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदाराला काम दिले. 14 नोव्हेंबर 2019 रोजी कार्यरंभ आदेश देण्यात आला. मात्र, त्यानंतर सिमेंट, स्टीलचे दर वाढ झाल्यानंतर ठेकेदाराने काम करण्यास नकार दिला. महापालिकाच्या बांधकाम विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करून काम तत्काळ करण्याबाबत सुचविले. त्या कामांचे नियंत्रण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने वाढीव रक्कम देण्याचा बांधलकी बांधकाम विभागाचीच आहे. त्यास महापालिका बांधील राहत नाही. तसेच मंजूर निविदेमध्येही अंतर्भूत भाववाढ नाही. त्यामुळे भाववाढ देणे उचित नाही.

शहरातील अमृत भुयारी गटार योजनेची कामे पूर्ण होऊन रस्त्याची कामे प्रलंबित आहेत. प्रलंबित रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेत बैठक होऊन रस्त्याची कामे तत्काळ करावी, असे सूचित करण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत त्या रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाही. महापालिकेने त्या कामासाठी नगर विकास मंत्रालयाकडे अधिकच्या निधी मागणी होती. मात्र, अद्याप त्यास परवानगी मिळलेली नाही. त्यामुळे त्या निधीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, यासाठीचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला आहे.

या रस्त्याची कामे रखडली
1) रामचंद्र खुंट – तेलीखुंट – नेता सुभाष चौकपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे. 2) नगर वाचनालय ते भाजप कार्यालय ते पटर्धन चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे. 3) तख्ती दरवाजा – घुमरे गल्ली – समाचार प्रेस – लक्ष्मी कारंजापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे. 4) शहर सहकारी बँक, नवीपेठ – लोढा हाईट्स, नेता सुभाष चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news