शेवगाव तालुका : वृत्तसेवा : शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत पाच शेतकर्यांचा तब्बल दहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना काल मंगळवार दि.1 रोजी तालुक्यातील खरडगाव येथे घडली. दरम्यान, शेतकरी व ग्रामस्थ यांच्या शर्थीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यास वार्याची आडकाठी निर्माण झाल्याने शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवार दि.1 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या विद्युत वाहक तारांच्या शॉर्टसर्कीटने खरडगाव येथील ऊसाला आग लागली.
या आगीमध्ये गोरक्ष काशिनाथ काकडे यांचा दोन एकर, एकनाथ वामन लवांडे यांचा अडीच एकर, राम आश्राजी काकडे व ज्योती कल्याण बोडखे यांचा प्रत्येकी दीड एकर, साहेबराव किसन काकडे यांचा अडीच एकर असा सुमारे दहा एकर ऊस जळून खाक झाला. शेतकरी व ग्रामस्थांनी आग विझवण्याचे अथक प्रयत्न केले मात्र वार्यामुळे आग विझवता न आल्याने पाच शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीत ऊस जळाल्याने लोकनेते घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याचे अॅग्री सुपरवायझर संजय अरगडे, फिडमन काकासाहेब लबडे यांनी घटनास्थळी भेट देवून तातडीने आज ऊसतोडणी कामगारांच्या चार टोळयाद्वारे सदर ऊसाची गळीतासाठी तोडणी सुरू केली आहे.