

अहमदनगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत आयुक्त, उपायुक्त, मुख्यलेखाअधिकारी, मुख्यलेखा परीक्षक कार्यालयात वेळेवर येत नाहीत. ते दिवसभर कार्यालयात बसत नाही. महापौरांना न कळविता रजेवर निघून जातात. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महापौर रोहिणी शेंडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले, शासनाने आयुक्त पंकज जावळे, उपायुक्त यशवंत डांगे, मुख्यलेखाअधिकारी शैलेश मोरे, मुख्यलेखापरिक्षक विशाल पवार यांची नेमणूक केली आहे. परंतु, वरील अधिकारी कामकाजाच्या वेळेत मनपात बसत नाहीत. सकाळी 11 नंतर ते कार्यालयात येतात. दुपारी जेवणासाठी दीड वाजता गेल्यानंतर चार वाजता येतात. परस्पर रजेवर जाणे, अर्ज न देता सुट्ट्या घेणे असे प्रकार वारंवार होत आहेत. मनपा प्रशासनात अधिकारी मुख्य घटक असून, त्याच्या वृत्तीमुळे प्रशासकीय कामकाजाला विलंब होत आहे.
त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. आयुक्त पंकज जावळे देखील वारंवार रजेवर जातात. त्याबाबत महापौरांना कल्पनाही देत नाहीत. त्यांना संपर्क केल्यानंतर कळते ते रजेवर गेले आहेत. परिणामी महापौरांचे नियंत्रण नाही, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. तसेच, मुख्यलेखाअधिकारी शैलेश मोरे व मुख्यलेखापरिक्षक पवार दोन्ही अधिकारी एकत्रितपणे रजेवर जातात. महानगरपालिकेत सकाळी ऑफिस वेळत उशिरा येतात. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले काम विलंबाने होतात.
महापालिकेत अधिकारी पदाधिकारी व नगरसेवकांना न जुमानता मनमानी पद्धतीने कामकाज करीत आहे. याबाबत महासभेमध्ये नगरसेवकांनी देखील या अधिकार्यावर कारवाई होण्यासाठी ठराव पारित करण्याची विनंती केली आहे. त्यांचे वर्तन पाहता त्यांना महानगरपालिकेत कामकाज करण्याची इच्छा दिसून येत नाही, असेही महापौर रोहिणी शेंडगे यांनी म्हटले आहे.
उपायुक्त डांगे यांनी पदाभार घेतल्यापासून ते कधीच वेळेवर आले नाही. तेही वारंवार रजेवर जातात. त्याबाबत महापौर कार्यालयाला कळविले जात नाही. त्यामुळे नगरसेवकांसह नागरिकांच्या कामांचा खोळंबा होतो. त्यांच्याकडे घनकचरा विभागाचे काम आहे फक्त याच विभागाबाबत ते तत्पर असून त्यांच्या मर्जीतील एजन्सीला काम देतात. तसेच, 15 व्या वित्त आयोगाचा निधी विनियोग करण्यासाठी मनपाच्या महासभेची मंजुरी आवश्यक असताना मंजुरी न घेता परस्पर निधी खर्च करतात, असे महापौरांनी निवेदनात म्हटले आहे.