नगर : माठ फोडत महापालिकेत आयुक्तांना घेराव

नगर : माठ फोडत महापालिकेत आयुक्तांना घेराव

नगर; पुढारी वृत्तसेवा : केडगाव, कायनेटिक चौक परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. गेल्या 11 दिवसापासून नळ व टँकरद्वारे देखील पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी शुक्रवारी (दि. 24 मार्च) महापालिकेत आयुक्तांना घेराव घालत माठ फोडून आक्रोश व्यक्त केला. आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास रस्तारोकोचा इशारा दिला.

प्रभाग सतराच्या नगरसेविका लताताई शेळके, नगरसेवक राहुल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केले. यावेळी सुनील पवार, साहेबराव सुपेकर, सूरज कोतकर, रवींद्र शिंदे, सूरज शेळके, किसन आहेरकर, आप्पा निकाळजे, राजू तांबोळी, गोरख जाधव, दिगंबर तिजोरे आदींसह महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

केडगाव, कायनेटिक चौक परिसरातील रविश कॉलनी, सारस कॉलनी, प्रियंका कॉलनी, आव्हाड विटभट्टी, छायानगर, लक्ष्मीकृपा नगर, अजय गॅस गोडाऊन मागील परिसर, इंदिरानगर, विद्यानगर, हनुमान नगर, सुखकर्ता कॉलनी, सुभद्रानगर, डिंमळे मळा या परिसरात गेल्या सहा महिन्यापासून पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, मागील अकरा दिवसापासून नळाद्वारे व टँकरद्वारे पाणी मिळाले नसल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलन केले. येत्या आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास कायनेटिक चौकात रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाची सरबत्ती करीत आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदन दिले. या भागात तत्काळ दोन टँकर वाढवून देण्यात येतील. पंधरा दिवसांत फेज टू ची लाईन सुरू करुन देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news