

नगर : पुढारी वृत्तसेवा : तुम्हाला आजपासून बडतर्फ केले आहे, असे म्हणत मुख्याध्यापिकेच्या कार्यालयाचा ताबा घेत, पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापकाला मारहाण व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी पंधराजणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.21) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत विद्यालयाचे शिक्षक पर्यवेक्षक जफर हसनमियाँ सय्यद (रा. झेंडीगेट) यांनी फिर्याद दिली आहे.
सय्यद अब्दुल मतीन अब्दुल रहीम, सय्यद बहाब, मौलाना शफीक रशीद कासमी, गुलाम दस्तगीर, शेख अकील लियाकत, शेख समी इमाम, शेख तन्वीर चाँद, शेख समद वहाब, शेख नबेद रशीद, शेख मुशाहिद लियाकत (वय पत्ता माहित नाही) व इतरअनोळखी 2 पुरुष व 3 महिला अशा पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाँद सुलताना हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जफर हसनमियाँ सय्यद हे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. रविवारी दुपारी 12.30 च्या सुमारास मुख्याध्यापक कार्यालयात मुख्याध्यापीका गुलनाज युसूफ इनामदार, उपमुख्याध्यापक इलियास गणी तांबोळी यांच्यासमवेत एका विषयावर बैठक सुरू होती.
त्याठिकाणी आरोपींनी जबरदस्तीने परवानगी न घेता मुख्याध्यापकांच्या कार्यालयात जाऊन खुर्च्यांचा ताबा घेत, मुख्याध्यापिका यांना तुम्हाला आजपासून बडतर्फ केले आहे. तसेच तुम्ही येथे बसू नका अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी दिली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धक्काबुक्की व शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अनोळखी एका महिलेने तुम्ही काही कारवाई केली तर मी तुमच्याविरुद्ध विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करील, अशी धमकी दिली. पुढील तपास पोलिस नाईक मासाळकर करीत आहेत.