

मिरजगाव : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी रविवारी अचानक कर्जत तालुक्याला भेट दिली. यावेळी शेततळे, सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, औजार बँक यांची पाहणी केली. अनुदान दिलेले हार्वेस्टिंग मशीनही चालविले. वृक्षारोपण करून विविध बाबींची पाहणी केली. दौर्याची सुरुवात आखोणी येथील शेतकरी नवनाथ सायकर यांच्या वैयक्तिक शेततळ्याच्या कामाची पाहणी करून झाली. कोरडवाहू भागातील शेतकर्यांना शेततळे हे वरदान असून, मागेल त्याला शेततळे या योजनेतून शेततळे दिले आहे. फळबागा व ठिबक सिंचन या बाबींचा कृषी विभागाकडून लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. राशीन येथील जगदंबा शेतकरी गटाच्या औजार बँकेची पाहणी व तपासणी केली. यानंतर कोळवडी येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अतंर्गत सद्गुरू दत्त दूध प्रक्रिया उद्योग यांच्या प्रकल्पास भेट दिली व उद्योगाबाबतीत मार्गदर्शन केले.
यानंतर कर्जत येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी व पर्यवेक्षक यांची आढावा बैठक घेतली. कृषी विभागाच्या प्रत्येक अधिकारी, कर्मचार्याने जास्तीत जास्त शेतकर्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन योजना पोहचविण्याबरोबर उत्पादन वाढविण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे निर्देश दिले. या प्रसंगी सीआरए तंत्रज्ञानाचा वापर करून एक नारळाच्या रोपाची लागवड आयुक्तांच्या हस्ते करण्यात आली. कोरडवाहू भागात या तंत्रज्ञानाचा वापर करून फळबागा लागवड करण्याविषयी त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांना सूचना दिल्या.
यावेळी जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, कर्जत तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, कर्जत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक बापूसाहेब होले, मंडल कृषी अधिकारी मिरजगाव अमर जगताप आदी उपस्थित होते. शनिवारी सायंकाळी उशिरा कृषी आयुक्त सुनील चव्हाण हे दौर्यावर येत असल्याचा निरोप आला. कृषी विभागाच्या अधिकार्यांनी रात्रीतून दौर्याचे यशस्वी नियोजन केले. याबद्दल कृषी आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.
हेही वाचा :