नगर: पुढारी वृत्तसेवा : शाळा सुटल्यानंतर सायकलवर घरी जात असलेल्या विद्यार्थ्यांचा अवजड वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १) सायंकाळी बालिकाश्रम रस्त्यावरील सर्वोदय कॉलनीजवळ घडली. अथर्व हरीशकुमार वेताळ (वय १२, रा. समता नगर, कल्याण रोड) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
अथर्व वेताळ रेसिडेन्सिअल हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकत होता. त्याचे आई- वडील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदा (ता. कर्जत) येथे शिक्षक आहेत. अथर्व हा कल्याण रोडवरून दररोज सायकल वर शाळेत येत असे. मंगळवारी सायंकाळी शाळा सुटल्यावर तो सायकलवर घरी जात असताना नीलक्रांती चौकातून सर्वोदय कॉलनी रस्त्याने जात असताना एका अवजड वाहनाची त्याला धडक बसली. त्यात तो गंभीर जखमी झाला.
त्याला परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या घटनेची माहिती समजल्यानंतर कल्याण रोड परिसरातील शिक्षक, नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. आमदार संग्राम जगताप यांनीही जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी त्यांच्या समोर नागरिकांनी संताप व्यक्त करत अवजड वाहनांना दिवसा शहरात प्रवेश बंदी असताना अशी वाहने येतात कशी? याबाबत ठोस उपयायोजना व्हाव्यात, शाळा सुटण्याच्या वेळी वाहतूक पोलिस तैनात करून वाहतुकीचे नियोजन केले जावे, अशा मागण्या केल्या.