नगर : एसटी बसवर तरुणाकडून दगडफेक; एक जखमी
राहुरी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : नगर- मनमाड राज्य महामार्गावर राहुरी फॅक्टरी येथे दिनांक 8 मे रोजी सायंकाळी रस्त्याने जात असलेल्या बसला थांबवून 'मी इथला भाई आहे'. असे म्हणून एका तरुणाने बसवर दगडफेक केली. या घटनेत बसचे नुकसान झाले असून एक प्रवाशी महिला जखमी झाली. संदीप नारायण मोरे हे दौंड आगारात एसटी बस चालक आहेत. ते दिनांक 8 मे रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान बारामती ते शिर्डी बस घेऊन निघाले होते. दरम्यान राहुरी फॅक्टरी येथील ताहराबाद चौकात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास प्रवासी गाडीतून खाली उतरत असताना एक इसम मोटरसायकलवर आला आणि म्हणाला की,'मी येथील भाई आहे'. असे म्हणून त्याने बस चालकाला शिवीगाळ करून एस. टी. बसवर दगडफेक केली.
सदर इसमाने एस. टी. बसवर दगडफेक केली. त्यामुळे एस. टी मधील असलेली महिला प्रवाशी शारदा श्रीकांत नाचणेकर (वय 50 वर्षे, रा. शांताक्रूझ, मुंबई) यांना किरकोळ दुखापत झाली असून एस. टी. बसचे नुकसान झाले. एस.टी. बस मध्ये एकूण 50 ते 55 प्रवासी होते. चालकाच्या फिर्यादीवरून आरोपी सागर उल्हारे (रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

