कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुका पोलिस ठाणे हद्दीतील शेतकर्यांचे पशुधन चोरी करणार्या आरोपींना पोलिसांनी काही तासात जेरबंद केले आहे. पोलिसांच्या सदर कामगिरीबाबत कौतुक केले आहे. याबाबतची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दिनांक 13 ते 14 मार्च रोजी आडीच वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलिस ठाणे हद्दीतील रवंदा शिवारातून 47 वर्षीय शेतकरी शालिनी संजय कदम यांचे मालकीची दहा हजार रुपये किमतीची तांबड्या रंगाची शेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती.
याबाबत तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत तालुका पोलिसांकडून सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, तीन अनोळखी इसम हे टोलनाक्याकडून नाटेगावकडे मोटारसायकल व शेळीसह उभी आहेत. पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन सदर इसमांना ताब्यात घेऊन नाव, गाव, पत्ते विचारले असता, त्यांनी लक्ष्मण लहू पवार (वय 24), सागर राजेंद्र मोरे (वय 18), भीमा रामदास मोरे (सर्व रा. निमगाव मढ, ता. येवला जि. नाशिक) अशी सांगितली असून त्यांनी सदर चोरीबाबत कबुली दिली आहे.
सदर आरोपींकडून पोलिसांनी पंचेचाळीस हजारांची मोटारसायकल व चोरीस गेलेली शेळी असा एकूण 55 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कौतुकास्पद कामगिरी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, साहाय्यक फौजदार सुरेश गागरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप बोटे, पोलिस कॉन्स्टेबल युवराज खुळे, जयदीप गवारे, चंद्रकांत मेढे यांनी केली आहे. सदर आरोपींनी अशाच प्रकारचे पशुधन चोरीचे गुन्हे केले आहे का? या बाबत पुढील तपास सुरू आहे.