कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : स्कुटी गाडी धूमस्टाईलने पळवून नेत, गाडीची डीक्की तोडून साडेसात लाख रुपयांची रोकड चोरून चोरटा धूम स्टाईल पसार झाल्याने कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार आज (दि. 5) रोजी खर्डे कॉम्प्लेक्ससमोर दुपारी 12 वाजेच्या दरम्यान घडल्याची माहिती तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक भरत दाते यांनी दिली. जमीन खरेदीसाठी बँकेतून काढून आणलेल्या साडेसात लाखांच्या रोकड रकमेवर पाळत ठेवून चोरट्याने भर दिवसा डल्ला मारला. याप्रकरणी शहरातील मोहिनीराज नगर येथे राहणारे विकास मोहन आव्हाड (वय 28 वर्षे) यांनी कोपरगाव पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, तपासात चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे सांगण्यात आले.
आव्हाड यांनी जमिनीच्या खरेदीच्या व्यवहारासाठी सुमारे साडेसात लाख रुपयांची रोकड बँकेतून काढून आणली होती. यानंतर त्यांनी शहरातील खर्डे कॉम्प्लेक्ससमोर (स्कुटी एम एस 17 सी क्यू 21 86) गाडी लावून चौकशी करण्यासाठी ते गाडीचे हँडल लॉक न करताच खाली असलेल्या ऑफिसमध्ये गेले. तेवढ्यात अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून स्कूटी गाडी चोरून नेऊन टिळकनगर येथील सार्वजनिक शौचालयासमोर लावून तिची डिक्की तोडून सुमारे साडेसात लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली. रक्कम घेऊन स्कुटी गाडी त्याच ठिकाणी लावून चोरटा पसार झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत विकास आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 215/2023 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करीत आहे. शहरात भुरट्या चोरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अनेक चार चाकी, दुचाकी गाड्या चोरींचे मोठे पेव फुटले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे.