अकोले : अवैध दारूविक्रीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन

अकोले : अवैध दारूविक्रीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन
Published on
Updated on

अकोले : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शाहुनगर व राजूर मध्ये अवैध दारू विक्री थांबत नसल्याने या परिसराला भेट देऊन वस्तुस्थिती बघावी असे पत्राद्वारे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दारुबंदी चळवळीचे प्रणेते हेरंब कुलकर्णी यांनी दिले आहे. अहमदनगर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक राकेश ओला रुजू झाल्यावर अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत पहिल्याच बैठकीत आदेश दिले याचे आम्ही स्वागत करतो. दारुबंदी चळवळीने नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अवैध दारू बंद व्हावी म्हणून दि.१५ ऑगस्ट ला शाहुनगर मध्ये आंदोलन केले पण अजूनही दारू थांबत नाही. ज्या शाहूनगर मध्ये आजपर्यंत २३ मृत्यू झाले त्याठिकाणी आंदोलन करूनही आता पुन्हा दोन महिलांनी दारु विक्री सुरू केली आहे.

राजूर या गावात दारूबंदी असूनही खुलेआम दारू विकली जात आहे.यासंदर्भात ३० सप्टेंबर रोजी अकोले येथे पोलीस स्टेशनला बैठक होऊन सुद्धा काहीही फरक झालेला नाही. तर संगमनेर येथील पोलिस उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांच्याशी संपर्क साधूनही अपेक्षित परिणाम झाला नाही. तर वास्तविक १५ ऑगस्ट च्या आंदोलनात त्यांनी दारू बंद करण्याचा शब्द दिला होता. पण आता त्यांचे मुख्यालय असलेल्या संगमनेर येथूनच दारू येते आहे. असे या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनातील मागण्या :

शाहूनगर येथे पुन्हा दारूविक्री सुरू झाल्याने तेथील विक्रेते तातडीने तडीपार करावे व तेथे दारू देणाऱ्या दुकानांवर कारवाई करावी.

राजूर येथे पूर्णवेळ पोलीस निरीक्षक नियुक्त करून दारूविक्रेत्यावर झालेल्या केसेस एकत्र करून तडीपार प्रस्ताव करावेत.

राजूरचे अनेक पोलीस दारूविक्रेत्याना सामील असल्याने ज्यांच्या बिट मध्ये दारूविक्री होते त्यांना निलंबित करावे.

इंदोरी फाट्यावरील हॉटेल सह्याद्रीमधून दारूविक्री होत असल्याने हे हॉटेल कायमस्वरूपी सील करण्याबाबत आपण इतर विभागांना पत्र द्यावे.

आपण संगमनेर उपविभागीय अधिकारी, अकोले, राजूर पोलीस स्टेशन यांना अवैद्य दारू विक्री बाबतच्या विविध मागण्यांबाबत योग्य ते आदेश द्यावेत. अन्यथा पुढील आठवड्यात अकोले दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते राजूर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करणार असल्याचे पत्र दारूबंदी चळवळीचे प्रणेते हेरंब कुलकर्णी यांनी दिले आहे.

अकोले तालुक्यातील राजुर, कोतुळ, विरगाव फाटा परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्याच्या मिळकतीवर सुमारे १ लाख रुपयाचा बोजा चढवण्यात आला असुन दारूबंदी अधिनियम ९३ अन्वये १२ अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
                        – आर.डी वाजे. निरिक्षक. उत्पादन शुल्क विभाग. संगमनेर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news