

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज खरेदी-विक्री संघाची निवडणुकीत तेरा पैकी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर, उर्वरित अकरा जागांसाठी अठरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, या निवडणुकीत नागवडे-जगताप-पाचपुते यांनी सहमती एक्स्प्रेस राबविली जाणार आहे. अनेक नेत्यांनी मोर्चेबांधणी करून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा ध्यास घेतला होता.
मात्र, काही उत्साही कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या शब्दाला दुर्लक्षित करत स्वतःचे उमेदवारी अर्ज कायम ठेवले. निवडणुकीसाठी 148 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यावर छाननी झाल्यानंतर मंगळवारी (दि.31) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. इतर मागासवर्गीय प्रतिनिधीमधून शरद जमदाडे यांनी, तर भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्गातून संदीप सोनलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या दोन्ही प्रवर्गातील इतर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला.
सर्वसाधारण विकास सोसायटीमध्ये मच्छिंद्र ज्ञानदेव वाळके, शंकर एकनाथ शिपलकर, सुभाष मच्छिंद्र काळाने, भरत नानासाहेब भुजबळ, सुरेश मच्छिंद्र भापकर, पंडित रखमाजी कातोरे, भक्षुद्दीन शरीफउद्दीन शेख, सुनील पांडुरंग पाटील यांचे उमेदवारी अर्ज असून, वैयक्तिकमधून प्रदीप बजरंग औटी, विजयसिंग जयसिंग नवले, आदेश भुजंगराव नागवडे नंदकुमार मारुती कोकाटे, धोंडीबा बाप्पू लगड यांचे उमेदवारी अर्ज आहेत. तर, अनुसूचित जाती जमातीमधून नंदकुमार त्रिंबक ताडे , भारत सखाराम घोडके यांचे उमेदवारी अर्ज आहेत. महिला प्रतिनिधी म्हणून अर्चना दत्तात्रय पानसरे, मथुराबाई चंद्रकांत खेतमाळीस, गयाबाई मच्छिंद्र सुपेकर यांचे उमेदवारी अर्ज आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिमान थोरात यांनी दिली.
शरद जमदाडे यांची वर्णी
इतर मागास प्रवर्गातून आढळगावचे युवक कार्यकर्ते शरद जमदाडे, तसेच प्रकाश निंभोरे यांनी अर्ज दाखल केले होते. निंभोरे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, तर जमदाडेंसाठी माजी आमदार राहुल जगताप, बाळासाहेब नाहटा , बाबासाहेब भोस, अण्णासाहेब शेलार आग्रही होते. चर्चेअंती जमदाडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन त्यांची बिनविरोध वर्णी लागली.