

अमोल गव्हाणे
श्रीगोंदा : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून, ग्रामपंचायत मतदारसंघात 'सोयर्या-धायर्या'चे राजकारण जोमात असल्याचे दिसते आहे. ग्रामपंचायत मतदारसंघातील उमेदवार मितेश नाहाटा यांच्यासाठी ही बाब धोक्याची घंटा असल्याची चर्चा आहे. समितीच्या अठरा जागांसाठी निवडणूक होत आहे. माजी आमदार राहुल जगताप यांची तालुक्यातील अनेक सेवा संस्थांवर पकड असल्याने जगताप गटाचे पारडे जड मानले जाते.
त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत आ. पाचपुते-नागवडे हे पारंपरिक विरोधक एकत्र आल्याने जगताप गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अठरा जागांसाठी निवडणूक होत असली तरी काष्टीचे सरपंच साजन पाचपुते आणि मितेश नाहाटा हे दोघे ग्रामपंचायत मतदारसंघात निवडणूक लढवित असल्याने या मतदारसंघातील लढतींकडे विशेष लक्ष लागले आहे. आ.पाचपुते-नागवडे गटाने महेश दरेकर आणि सुदाम झराड असे तगडे उमेदवार दिले आहेत. या मतदारसंघात 'सोयर्या-धायर्या'चे राजकारण विचारात घेऊन दरेकर आणि झराड यांना मैदानात उतरविण्यात आल्याची चर्चा आहे.
तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत केले जाणारे 'सोधा' राजकारण मितेश नाहाटा यांच्या विजयात अडसर ठरते की काय याची आता चर्चा सुरू झाली आहे. नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व राज्य बाजार समिती संघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्यातील सख्य तालुक्याला माहिती आहे.
नाहटा यांच्या राजकीय खेळीने त्रस्त असलेले राजेंद्र नागवडे यांनी मितेश नाहाटा यांच्या पराभवाचा चंग बांधला आहे. कोणत्याही परिस्थितीत मितेश नाहटा निवडून येणार नाहीत, याची पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. त्यातच जगताप समर्थकांचा एक गट बाळासाहेब नाहाटा यांच्यावर नाराज असून, त्याचाही नाहाटांना फटका बसू शकतो. एकूणच समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदारसंघातील दोन जागांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील 'सोधा' राजकारण नाहाटा मोडीत काढणार की त्यावर कडी करत बाजी मारणार याकडे श्रीगोंदेकरांच्या नजरा लागून आहेत.
सभापतीपदासाठी पाडापाडी?
गेल्या तेरा वर्षांपासून बाळासाहेब नाहाटा यांची समितीवर पकड राहिली आहे. आता मितेश नाहाटा यांना निवडून आणून त्यांना सभापती करण्याचे नाहाटांचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे जगताप गटातील सभापतिपदाच्या अन्य दावेदारांपासून नाहाटा यांना धोका होऊ शकतो.