नगर जिल्हा काँग्रेसमध्ये उभी फूट; साळुंके यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

नगर जिल्हा काँग्रेसमध्ये उभी फूट; साळुंके यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : बाळासाहेब साळुंखे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने नगर जिल्हा काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघांमध्ये बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यामागे जिल्हा काँग्रेस असल्याचे सांगत काँगेस बंडाळीवर साळुंके यांनी शिक्कामोर्तब केले. नाशिक पदवीधर मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला म्हणून बाळासाहेब साळुंखे यांना काँग्रेस पक्षाचे कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या नोटीसीला उत्तर देण्याऐवजी बाळासाहेब साळुंखे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठविला आहे.

काँग्रेस पक्षाने नाशिक पदवीधर मतदारसंघांमध्ये पक्षाचे निष्ठावंत असणारे सत्यजित तांबे यांच्यावर अन्याय केला आहे आणि त्याचा निषेध म्हणून जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याने साळुंके यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. बाळासाहेब साळुंखे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, काँग्रेस पक्षाने निष्ठावान असणार्‍या कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडून दिले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पक्षाने निष्ठावंत असणार्‍या सत्यजित तांबे यांच्यावर अन्याय केला आहे.

हा अन्याय आमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना कधीही सहन होणार नाही. पक्षाने घेतलेली भूमिका चुकीची आहे. तरूणांना संधी दिली पाहिजे. आमदार सुधीर तांबे यांनी माघार घेऊन सत्यजित यांना संधी दिली. त्यात चुकीचे काय? असा सवाल करत त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली पण पक्षाने विचार केला नाही.

त्यानंतर चर्चेने हा विषय मार्गी लावता आला असता पण तसेच न करता डॉ. तांबे व सत्यजित तांबे या दोघांवर कारवाई करण्यात आली. जिल्हा काँग्रेस तांबे यांच्या मागे उभी असून नेते व कार्यकर्ते तांबे यांचा प्रचार उघडपणे करत आहे. काँग्रेस पक्षाकडे आज कोणीही येण्यास तयार नाही, पक्ष अडचणीत आहे, असे असताना निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करण्यात येत असल्याचे साळुंखे म्हणाले.

दोघे निष्ठावंत मात्र भूमिका परस्परविरोधी
जिल्हाध्यक्ष साळुंके आणि नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे दोघेही माजी मंत्री आ. बाळासाहेब थोेरात यांचे निष्ठावंत समर्थक आहेत. यातील साळुंके यांनी राजीनामा देत तांबेंची पाठराखण केली तर काळे यांनी मात्र काँग्रेससोबत असल्याचे सांगत तांबे यांच्यावर टिकास्त्र सोडले. तांबे यांनी नगर शहर मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी केली तेव्हा त्यांच्याशी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांशी पंगा घेतला. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तांबे यांनी कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडून दिले. नगर शहर काँग्रेस तांबे यांच्या पाठिशी नसून शिवसेना पुरस्कृत मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यासोबत असल्याचे काळे यांनी जाहीर केले. त्यामुळे आ. थोरात यांच्या दोघा निष्ठावानांच्या दोन भूमिका नगरमध्ये चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news